Kolhapur: सव्वापाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, पाठलाग करून तिघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:51 IST2025-12-27T16:50:57+5:302025-12-27T16:51:11+5:30
सिंधुदुर्गमधून आणली विक्रीसाठी

Kolhapur: सव्वापाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, पाठलाग करून तिघांना पकडले
कोल्हापूर : सुमारे सव्वापाच कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विकण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डमी ग्राहक पाठवत पाठलाग करून अटक केली. पुणे-बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी येथे शुक्रवारी (दि. २६) रात्री केलेल्या कारवाईत माशाची सव्वापाच किलो उलटी, कार आणि मोपेड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सिंधुदुर्गमधील एका व्यक्तीकडून माशाची उलटी विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली.
संभाजी श्रीपती पाटील (वय ७८, रा. चंद्रे, ता. राधानगरी), अनिल तुकाराम महाडिक (५५, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) आणि कर्नाटकातील प्रमोद उर्फ पिटू शिवाजी देसाई (४८, रा. चिक्कलवहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार परशुराम गुजरे यांना काही व्यक्ती पुणे-बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांच्या पथकाने कणेरीवाडीजवळ डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच विक्रीसाठी आलेले तिघे पळून निघाले होते. पोलिसांनी पाठलाग करून खानविलकर नगर येथे त्यांना पकडले.
संभाजी पाटील याच्याकडील सॅकमध्ये माशाची उलटी आढळली. पाटील याच्यासह देसाई आणि महाडिक यांच्यावर पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे. अंमलदार संतोष बरगे, सागर चौगले, योगेश गोसावी, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, वनअधिकारी जगन्नाथ नलवडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.