कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

By Admin | Updated: September 7, 2015 22:41 IST2015-09-07T22:41:31+5:302015-09-07T22:41:31+5:30

कलबुर्गी हत्या प्रकरण : मेघा पानसरे यांनी घेतली कलबुर्गी कुटुंबीयांची भेट, तिन्ही कुटुंबीयांमार्फत विचारणा करणार

We will meet Karnataka chief minister | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोल्हापूर : कन्नडमधील ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा न लागल्यास १३ सप्टेंबरनंतर कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे याचे कुटुंबीय एकत्रिपणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तपासाबाबत विचारणा करणार आहेत. रविवारी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी धारवाडला जाऊन कलबुर्गी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.रविवारी (दि. ६) मेघा व कबीर पानसरे कलबुर्गी कुटुंबीयांना भेटण्यासाठी धारवाड येथे गेले होते. तिथे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी (चेन्नई), ज्येष्ठ कन्नड कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेमा पट्टणशेट्टी, कर्नाटक स्त्री साहित्यिक संघाच्या अध्यक्ष डॉ . वसुंधरा भुपती, प्रा. शशीधर तोडकर, शंकर हलगत्ती असे सर्व डॉ. कलबुर्गी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी उमादेवी, मुलगा श्रीविजय व इतरांची भेट घेऊन सांत्वन केले. खुनाची घटना व त्याचे तपशील समजून घेतले. याप्रसंगी मेघा यांनी आपले अनुभव सांगितले. कलबुर्गी कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. डॉ. कलबुर्गी यांची ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेले साहित्य अकादमीसह इतर असंख्य पुरस्कार त्यांच्या विपुल कार्याची जाणीव करून देत होते. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकाच प्रवृत्तीचे लोक आहेत असे समोर आले. धर्मचिकित्सा हा तिघांच्याही प्रबोधनकार्याचा गाभा होता. त्याला अनेकांचा विरोध होता.
दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांच्या तपासाबद्दल सखोल चर्चा झाली. चर्चेअंती असे ठरले की एक आठवडा तपासात काय निष्पन्न होते ते पाहायचे. जर काहीच धागेदोरे हाती लागले नसतील, तर १३ सप्टेंबरनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन तिन्ही कुटुंबीय खुन्यांना त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी करतील. विशेष तपास पथक स्थापून त्याना केवळ याच घटनेचा तपास करण्याची जबाबदारी द्यावी, अशीही मागणी करण्याचे ठरले. (प्रतिनिधी)


दबाव आणा---मेघा पानसरे, डॉ. वसुंधरा व डॉ. हेमा यांनी कन्नड साहित्यिक व विवेकवादी बुद्धिजीवी लोकांना आवाहन केले की त्यांनी अशा हत्यांचा निषेध करावा. शासनावर तपासासाठी दबाव आणावा.

Web Title: We will meet Karnataka chief minister