Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:57 IST2025-06-30T11:56:22+5:302025-06-30T11:57:22+5:30

प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा

We will block the highway tomorrow which will scare the government over the Shaktipeeth highway issue | Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची तीव्रता वाढवण्यासाठी कृषीदिनी मंगळवारी (१ जुलै) सकाळी ११ वाजता होणाऱ्या शिरोलीतील महामार्ग रोको आंदोलन सरकारला धडकी भरविणारा होण्यासाठी शहर, जिल्ह्यातून शेतकरी, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार रविवारच्या बैठकीत झाला.

येथील अजिंक्यतारा कार्यालयात शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने पूर्व तयारी बैठक झाली. बैठकीस सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी संघटना, निवृत्त प्राध्यापक आणि शिक्षक संघटनेसह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित राहून शक्तिपीठ विरोधी भूमिका मांडून रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आणण्याचे आश्वासन दिले. माजी महापौर आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठ विरोधात मंगळवारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलाजवळील महामार्ग रोकण्याचे आंदोलन होईल. आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार ताकद लावली आहे. बाधित शेतकऱ्यांसह वाहनधारक, सामान्य लोक, नोकरदारही आंदोलनात सहभागी होतील. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केली तरी त्याला भीक घालू नये.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, महामार्ग रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील लोक सहभागी होण्यासाठी माजी नगरसेवकांची मदत घेण्यात येईल. यासाठी माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अनिल लवेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील. कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झाल्यास बाधित शेतकरी संपणार आहे. वाहनधारकांनाही टोलच्या रूपाने झळ बसणार आहे.

किसान काँग्रेसचे सागर कोंडेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग सरकार आपल्या बगलबच्चांना घेऊन रेटत आहे. वारंवार शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे. म्हणून इंडिया आघाडीच्या माध्यमातून महामार्गास तीव्र विरोध करू. उद्धवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी शहरातील मोठ्या संख्येने लोक महामार्ग रोकोत सहभाग करू, असे आश्वासन दिले.

यावेळी सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, रघुनाथ कांबळे, दिलीप पोवार, अभिजित कांबळे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष देसाई, प्रवीण केसरकर यांची भाषणे झाली. बैठकीस ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगुले यांच्यासह इंडिया आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा

कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील बाधित शेतकरी सुरेश संकपाळ म्हणाले, शक्तिपीठ विरोधासाठी शहरातून व्यापक पाठिंबा मिळतोय, हे आमच्यासाठी मोठा आधार आहे. शक्तिपीठ झाला तर माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार आहे. म्हणून कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. विरोधी भूमिका घेण्यासाठी आम्ही प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चाही काढणार आहे. कागल, भुदरगड तालुक्यांतील बाधित शेतकरी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरी जाऊन शक्तिपीठ महामार्गावर भूमिका जाहीर करा, असा आग्रह धरणार आहे.

Web Title: We will block the highway tomorrow which will scare the government over the Shaktipeeth highway issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.