पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरू; मात्र, 'हेच' मतदार ठरतील पात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:30 IST2025-10-03T12:29:36+5:302025-10-03T12:30:29+5:30
३० डिसेंबरला यादी प्रसिद्ध होणार

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरू; मात्र, 'हेच' मतदार ठरतील पात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला माहिती
कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी पात्र असते. यापूर्वी मतदान केलेले शिक्षक, पदवीधरांनाही पुन्हा नोंदणीची प्रक्रिया करावी लागणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी पदवीधर झालेलेच मतदारांसाठी पात्र ठरतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सन २०२० मधील मतदार नाव नोंदणी असली तरी पदवीधर, शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. शिक्षक मतदार नोंदणीसाठी सन २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहतील.
शैक्षणिक संस्थांचे प्रमुख (मुख्याध्यापक किंवा प्राचार्य) एकत्रितरीत्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करू शकतात. कोणतेही राजकीय पक्ष, केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरिक कल्याण संघटनांकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. मात्र, एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या कुटुंबीयांचे अर्ज कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती देऊ शकते. यावेळी निवडणुकीचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार सुनील शेरखाने आदी उपस्थित होते.
ऑनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेसाठी प्रयत्न
पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे काम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून होत आहे. प्रणाली सुरू झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.