Kolhapur: हिंसक भटक्या कुत्र्यांचा पाणवठ्यावर सांबरांवर हल्ला, कारवाई करता येत नसल्याने वनकर्मचारी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:24 IST2025-07-18T13:23:52+5:302025-07-18T13:24:37+5:30
मोकाट कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली

Kolhapur: हिंसक भटक्या कुत्र्यांचा पाणवठ्यावर सांबरांवर हल्ला, कारवाई करता येत नसल्याने वनकर्मचारी हतबल
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : जिल्ह्यातील शहरी भागातील मोकाट कुत्री गगनबावडा गावात व शेजारी असणाऱ्या जंगलात सोडली जात आहेत. ही कुत्री आक्रमक बनल्याने जंगलातील वन्यप्राण्यांवरच हल्ले करीत आहेत. यामुळे निसर्गसंपन्न तालुक्यातील वन्यजीवांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांत तब्बल सहा वेळा या मोकाट कुत्र्यांनी सांबर, भेकर व अन्य वन्यजीवांवर हल्ले केल्याने वनविभागाचे कर्मचारी हतबल झाले आहेत. भारतीय न्याय संहिता सेक्शन २९१ नुसार कुत्र्यांवर कारवाई करता येत नसल्याने वनविभाग व ग्रामपंचायतीचे हात बांधले आहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांवर कुणी कारवाई करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गगनबावडा गावाजवळ नागझरी तलावावर वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. या तलावावर सांबर, भेकर, बिबटे, साळिंदर, ससा, गवा हे प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. येथील बोरबेट, बावेली या घनदाट जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहेत. ही कुत्री घनदाट जंगलात जाऊन प्राण्यांवर हल्ले करीत आहेत.
झुंडीने हल्ले
भटक्या कुत्र्यांचा झुंड प्रशिक्षित शिकाऱ्याप्रमाणे ही वन्यप्राण्यांवर हल्ले करीत आहे. यात काही प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. तर काही प्राणी जखमी झाले आहेत.
गावात कुत्र्यांची संख्या वाढली तर बिबटे येण्याची शक्यता आहे. परिणामी माणूस व बिबटे यांचा संघर्ष वाढेल. वन्यप्राण्यांच्या संपर्कात जर ही कुत्री आली तर कॅनाइन डिस्टेंम्पर हा रोग होऊन तो पसरण्याची भीती आहे. - कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक, कोल्हापूर.
नागझरी तलावाजवळील खाद्यापदार्थांच्या दुकानांमधील कचरा टाकण्यास मनाई केली आहे. ही कुत्री अचानक कशी वाढली, याचा आम्ही शोध घेत आहे. - मानसी कांबळे, सरपंच, गगनबावडा.