Kolhapur- गर्भलिंग निदान प्रकरणातील गोळ्यांचा पुरवठादार विजय पाटील अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:23 IST2024-12-23T12:22:41+5:302024-12-23T12:23:52+5:30
दोन दिवसांची पोलिस कोठडी, आणखी काही संशयित रडारवर

Kolhapur- गर्भलिंग निदान प्रकरणातील गोळ्यांचा पुरवठादार विजय पाटील अटकेत
कोल्हापूर : बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी विजय सुनील पाटील (वय २५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) याला रविवारी (दि. २२) अटक केली. पाटील याने बोगस डॉक्टर दगडू पाटील याला गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केला होता. विजय पाटील हा एका औषध वितरण कंपनीकडे औषध पुरवठा प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करीत होता, अशी माहिती चौकशीत समोर आली. त्याला गोळ्या पुरवणाऱ्या वितरकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फुलेवाडी आणि जोतिबा डोंगर येथील प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत आरोग्य विभागाच्या पथकाला गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या होत्या. तसेच, जुना बुधवार पेठेतील ढिसाळ गल्ली येथे धन्वंतरी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत मोबाइल सोनोग्राफी मशीन सापडले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना बोगस डॉक्टर पाटील याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा विजय पाटील याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानेच गोळ्यांची विक्री केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या टोळीतील आणखी काही संशयित रडारवर असून, त्यांनाही लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
एमआरचे कनेक्शन
अटकेतील पाटील हा गेल्या तीन-चार वर्षांपासून एका औषध वितरक कंपनीकडे एमआर म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याला गर्भपाताच्या गाेळ्या कुठे मिळतात, याची माहिती होती. काही महिन्यांपूर्वी तो अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीत सामील झाला. त्यानेच बोगस डॉक्टरला गोळ्या पुरवल्या. त्याने कोणत्या वितरकाकडून गोळ्या मिळवल्या?, किती पाकिटे खरेदी केली होती?, किती रुपयांना त्याची विक्री केली?, आणखी कोणत्या डॉक्टरांना तो गोळ्यांची विक्री करीत होता? याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.