चुटकी वाजवून काढतो करणी, भूतबाधा; भोंदूबाबाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरात जादूटोण्याच्या प्रकारात होतेय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:06 IST2025-11-13T12:05:10+5:302025-11-13T12:06:00+5:30
भोंदूबाबाचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून त्याचा शोध सुरू

चुटकी वाजवून काढतो करणी, भूतबाधा; भोंदूबाबाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरात जादूटोण्याच्या प्रकारात होतेय वाढ
कोल्हापूर : मंत्र-तंत्र करून चुटकी वाजवत करणी आणि भूतबाधा काढण्याचा प्रकार करणारा चुटकी बाबाचा व्हिडीओ बुधवारी (दि. १२) सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात अंधश्रद्धा बोकाळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. संबंधित चुटकी बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमीसह तिट्टे, चौक, नदीकिनारी उतारे टाकणे, झाडांवर खिळे, टाचण्या टोचून काही फोटो लावणे, भूत काढणे, मंत्र-तंत्र करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. बुधवारी टिंबर मार्केट येथील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. एक मांत्रिक फ्लॅटमध्ये तरुणीला झोपवून तिच्यावरील करणी, भूतबाधा काढत आहे. यासाठी पूजाविधी सुरू असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. चुटकी वाजवून तो करणी काढत असल्याने चुटकी बाबा म्हणून तो प्रसिद्ध असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली.
व्हिडीओ व्हायरल होताच जुना राजवाडा पोलिसांनी भोंदूबाबाचा शोध सुरू केला. तो गेल्या तीन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यातील वाई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही. मात्र, लवकरच भोंदूबाबाला पकडून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
भोंदू चुटकी बाबाचा वाशी नाक्याजवळ दरबार
नवीन वाशी नाका येथील चिवा बाजार परिसरात एका भाड्याच्या घरात चुटकी बाबा राहतो. तिथेच त्याचा आठवड्यातून दोन दिवस दरबार भरतो. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तो शेकडो लोकांना रोज काही चमत्कार करून दाखवतो. अनेक महिलाही त्याच्या संपर्कात असल्याची माहिती या परिसरातील काही तरुणांनी दिली. पोलिसांच्या तपासातून त्याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.