तंत्रशिक्षण मंडळाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचा बळी

By Admin | Updated: July 31, 2015 01:00 IST2015-07-31T01:00:39+5:302015-07-31T01:00:39+5:30

अर्धवट पेपर तपासणी : पुरवण्या गायब होण्याचे प्रकार

The victims of the technical education system are afraid of the students | तंत्रशिक्षण मंडळाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचा बळी

तंत्रशिक्षण मंडळाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचा बळी

संदीप खवळे / कोल्हापूर
अर्धवट पेपर तपासणी, अख्खी पुरवणीच गायब, निकालपत्रक वेळेत नाही असा सावळा गोंधळ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या कारभारात आढळून येत आहेत. गारगोटी येथील इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हील अँड रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यांत्रिकी शाखेत पदविकेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग’ या पेपरची एक पुरवणीच गायब झाली आहे. बोर्डाने पाठविलेल्या उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीमध्ये ही पुरवणीच नाही.
इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ४० गुणांची आवश्यकता आहे. संबंधित विद्यार्थ्यांला ३० गुण मिळाले आहेत. बोर्डाने न पाठविलेल्या पुरवणीमधील प्रश्नासाठी १६ गुण होते, पण पुरवणीच गहाळ झाल्यामुळे संबंधित प्रश्न तपासला गेलेला नाही. उलट एकाच प्रश्नाची पुरवणी दोनदा जोडल्याची तक्रार या विद्यार्थ्याच्या पालकाने केली आहे.
याच कॉलेजमध्ये आयटी शाखेत शिकणाऱ्या निशिगंधा चौगले ह्या विद्यार्थिनीचा ‘अ‍ॅप्लाईड मॅथ्स्’ या विषयातील चार गुणांचा प्रश्न परीक्षकाने न तपासल्यामुळे ही विद्यार्थिंनी अनुत्तीर्ण झाली होती. तिला शंभरपैकी २९ गुण मिळाले. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३० गुणांची आवश्यकता आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या ‘अ‍ॅन्सर की’प्रमाणे या प्रश्नाचे उत्तर निशिगंधा हिने अचूकपणे सोडविले होते. हा प्रश्न तपासला असता तर तिला ३३ गुण मिळाले असते.
निशिगंधा हिच्या वडिलांनी बोर्डाकडून संबंधित पेपरच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून घेतली असता, प्रश्नक्रमांक ६-सी तपासला नसल्याचे आढळले. फेरतपासणीमध्येही ही चूक बोर्डाच्या लक्षात आली नाही पण पालकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निशिगंधा हिला न तपासलेल्या प्रश्नांसाठी दोन गुण देण्यात आले व ती उत्तीर्ण झाली. गुणपत्रिका देण्यासही तंत्रशिक्षण खात्याने आठ दिवस घालवले. या सावळा-गोंधळात अभियांत्रिकीच्या पदवीच्या प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीला गुणपत्रक मिळाले. प्रवेशास अर्ज भरण्यासाठी पालक-विद्यार्थिनीची प्रचंड धावपळ उडाली.
तंत्रशिक्षण मंडळाच्या या सावळा-गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जागरूक पालकांचा अपवाद सोडला तर बोर्डाच्या या कारभारापुढे हात टेकल्याशिवाय पर्याय नाही. तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडूनही उडवाउडवीचे उत्तरेच मिळतात अन् महाविद्यालये बोर्डाकडे बोट दाखवितात.
अनेक पालकांनी तंत्रशिक्षण खात्याच्या या कारभाराला कंटाळून फेरतपासणीचा नाद सोडला आहे, अशी माहिती या प्र्रकरणात तंत्रशिक्षण मंडळाच्या मुंबई कार्यालयापर्यंत पाठपुरावा केलेले पालक निवास चौगले यांनी दिली.

Web Title: The victims of the technical education system are afraid of the students