US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:36 IST2026-03-04T11:35:30+5:302026-03-04T11:36:32+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क : दुबईहून ८० नागरिक शुक्रवारी परतणार

US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले
कोल्हापूर : इराण आणि इस्रायल या देशांमधील युद्धामुळे आखाती देशात जिल्ह्यातील २०७ नागरिक अडकले आहेत. यापैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक सुखरूप परतले असून, ८० नागरिक दुबईहून निघून शुक्रवारी जिल्ह्यात पोहोचतील. ३९ नागरिक व कुटुंबीय नोकरीनिमित्त त्या देशात राहत असून, ते सुरक्षित आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष, हेल्पलाइन कार्यरत आहे नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आखाती देशांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि परतीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने तिकडे अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये.
ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
आखाती देशात अडकलेले जिल्ह्यातील नागरिक असे
- दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले पर्यटक : १५९
- कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले नागरिक : ३९
- कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील सदस्य : ७
- दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले नागरिक : २