Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:15 IST2025-08-11T12:13:52+5:302025-08-11T12:15:19+5:30
सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले

Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ
चंदगड : सत्तेच्या सारीपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करून ते बोलत होते.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, राजू रेडेकर, विष्णू गावडे, महेश पाटील, महादेव गुरव, शांता जाधव उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सहा महिन्यांत ७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शेतकऱ्यांची जाण नसणाऱ्या अशा या सरकारला या दिंडीच्या माध्यमातून जाग आणण्याची गरज आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सरकारला जाग आणण्यासाठी ही दिंडीची मशाल पेटविल्याचे सांगितले.
आम्ही गप्प बसणार नाही
शेतकरी भरडला जात असताना कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात ही बाब दुर्दैवी आहे. शेतकरी कर्जमाफीऐवजी हे सरकार शक्तिपीठ महामार्ग करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नसल्याचा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिला. तत्पूर्वी दिंडी रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रवळनाथला साकडे घालून कर्जमुक्तीची सद्बुद्धी सरकारला येवो असे मागणे घालण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणली.