Kolhapur: दोन दुचाकींच्या धडकेत दोन "अविनाश" ठार, कागल-निढोरी मार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:04 IST2026-03-04T12:04:00+5:302026-03-04T12:04:28+5:30
दोन गंभीर जखमी, आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते

Kolhapur: दोन दुचाकींच्या धडकेत दोन "अविनाश" ठार, कागल-निढोरी मार्गावर झाला अपघात
कागल : येथील कागल-निढोरी मार्गावर खेबवडे फाट्याला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. अविनाश भीमराव पाटील (वय ३२, रा. कोगील बुद्रुक, ता. करवीर) अविनाश विलास झेंडे (२८, रा. मोहरे, ता. पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत. शहाजी परीट (रा. कोगील बुद्रुक) सुरज पाटील (रा. साळशी, ता. शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अविनाश पाटील व शहाजी परीट हे दुचाकीने केंबळी या गावी जात होते, तर अविनाश झेंडे व सुरेश पाटील हे देखील दुचाकीनेच कागलकडे येत होते. ते आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते. खेबवडे गावाकडे जाण्यासाठी वळावयाच्या ठिकाणी या दोन्ही मोटारसायकली समोरासमोर धडकल्या. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागून दोघेजण जागीच ठार झाले. व दोघे गंभीर जखमी झाले.
जखमी सुरज पाटील यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात, तर परीट यास कणेरी मठ येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताच्या ठिकाणी खूप मोठा रक्तस्राव झाला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अविनाश पाटील हा दुचाकी गाड्या दुरुस्ती व शेतीही करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, विवाहित बहीण, चार वर्षे वयाचा एक व सहा महिन्याचा एक अशी दोन लहान मुले आहेत.