पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:00 IST2025-05-24T11:57:47+5:302025-05-24T12:00:11+5:30
जन्मजातच हृदय कमकुवत

पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना
शिरोली : संभापूर (ता. हातकणंगले) येथे पोटदुखी आणि उलट्या झाल्या, तसेच कार्डिओमायोपाथी हा आजार निष्पन्न होऊन हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोन लहान सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. विराज सागर पोवार (वय ४) आणि वरद सागर पोवार (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आणि शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण संभापूर हळहळत आहे.
अधिक माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे शेतकरी सागर पोवार हे कुटुंबासह राहतात. आठ दिवसांपूर्वी विराज आणि वरद हे सख्खे भाऊ सांगरूळ (ता. करवीर) येथे मामाच्या गावी सुट्टीला गेले होते. घरातील कामे आटपून आई पूजासुद्धा माहेरी गेल्या होत्या. सोमवारी (दि.१९) हे सर्वजण मामाच्या गावावरून परत आले. मंगळवारी वरद आणि विराज यांच्या पोटात दुखायला लागले, म्हणून त्यांना पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले.
गुरुवारी पुन्हा पोटात दुखू लागल्याने दोघांनाही पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता, तेथे विराजला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच अवघ्या एका तासात विराजचा मृत्यू झाला. वरदला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जा, असे डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री वरदला उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. पण, शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला. विराजचा अहवाल उत्तरीय तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या रक्ताचे नमुने, अवयव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत.
दोघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की, अनुवंशिक रोगामुळे झाला, हे पंधरा दिवसांनंतर अहवालानंतर आल्यावरच समजणार आहे.
दप्तर, वह्यांचीही खरेदी
मंगळवारी वरद आणि विराज यांना पेठवडगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन दोन्ही मुलांना शाळेचे दप्तर, वह्या, पिशव्या आई-वडिलांनी खरेदी केल्या होत्या. वरद आणि विराज यांना सर्दी, खोकला, ताप, कणकणी असं कोणताही आजार झाला नाही. फक्त पोटात दुखून उलट्या झाल्या आणि हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे.
हृदय १२ टक्केच कार्यरत
वरदला कोल्हापूर येथील मसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेव्हा त्याचे हृदय १२ ते १५ टक्के काम करत होते. सर्वसामान्य माणसाचे हृदय हे ६० ते ६५ टक्के काम करते, तसेच वरद पोवारचा इको केल्यावर कार्डीओमायापाथी निष्पन्न झाला आहे, असे डॉ. उदय पाटील यांनी सांगितले.