Kolhapur Accident News: आजऱ्याजवळ व्हॅन-टेम्पो'चा भीषण अपघात, गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:56 IST2025-12-25T11:55:26+5:302025-12-25T11:56:17+5:30
महिला गंभीर जखमी : भावाच्या वाढदिवसासाठीचा केक गाडीतच राहिला...

Kolhapur Accident News: आजऱ्याजवळ व्हॅन-टेम्पो'चा भीषण अपघात, गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार
आजरा : आजऱ्याजवळ व्हॅन व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार झाले तर गाडीतील महिला गंभीर जखमी झाली. मनीष सोलापुरे (२२ ) व कृष्णा कांबळे (४६, दोघेही रा. गडहिंग्लज) हे ठार झाले तर गीता कांबळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात व्हॅनचा चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी (दि. २३ ) रात्री १.३० वा.च्या सुमारास हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाशेजारील वळणावर घडली.
सावंतवाडी येथील आठवडा बाजारात भाजीविक्री करून मनीष सोलापुरे, कृष्णा कांबळे व गीता कांबळे हे तिघेजण व्हॅनने गडहिंग्लजकडे तर धाराशिवहून साहित्य भरून टेम्पो गोव्याकडे जात होता. रात्री १.३० वा. मनीष सोलापुरे चालवित असलेल्या व्हॅनने चुकीच्या दिशेला जाऊन टेम्पोला जोराची धडक दिली. यामध्ये कृष्णा कांबळे यांचा जागीच, तर उपचाराला घेऊन जात असताना मनीष सोलापुरे यांचा मृत्यू झाला. अपघातात गीता कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
व्हॅनमध्ये सर्व जखमी अडकले होते. तातडीने आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, दयानंद बेनके, विठ्ठल कांबळे, साजिद सिकलगार, संदीप म्हसवेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने गाडीसह जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविले. अपघातस्थळी गाडीच्या काचांचा खच पडला होता.
अपघातात दोन मिळवत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर दोघांवरही गडहिंग्लज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीष सोलापुरे यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ तर कृष्णा कांबळे यांच्या पक्षात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
भावाच्या वाढदिवसासाठीचा केक गाडीतच राहिला...
आई-वडिलांना भाजीविक्रीच्या व्यवसायात मनीष व त्याचा भाऊ अभिषेक मदत करत होते. मंगळवारी अभिषेकचा वाढदिवस होता. त्यासाठी मनीषने सावंतवाडीतून केक खरेदी केला. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. भावाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वीच अपघातात त्याचा मृत्यू झाला.