Kolhapur: भादोलेतील खून प्रकरण: संशयाच्या भुताने कुटुंब केले उद्ध्वस्त, दोन मुली झाल्या पोरक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:59 IST2025-10-01T18:57:42+5:302025-10-01T18:59:45+5:30
आज संपवायचे, याची पूर्ण तयारी करून आलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करून खून केला

Kolhapur: भादोलेतील खून प्रकरण: संशयाच्या भुताने कुटुंब केले उद्ध्वस्त, दोन मुली झाल्या पोरक्या
भादोले : किरकोळ कारणावरून होणारा वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसान खुनात झाल्याने भादोलेत दोन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत. भादोले - कोरेगाव रस्त्यालगत शेतात पत्नी रोहिणी पाटील हिचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी पती प्रशांत पाटील याच्यावर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात हजर झाला असून, त्याला अटक करण्यात आली. त्याला वडगाव न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी, आरोपीचे पत्नी रोहिणीसोबत किरकोळ प्रकरणावरून सतत भांडण होत होते. हा वाद बरेच महिने धुमसत होता. पण, तो वाद एवढ्या विकोपाला जाईल, याची कल्पना रोहिणीला आली नाही. आपल्या आजारी वडिलांना पाहून हे पती-पत्नी भादोले गावी येत होते.
परंतु, पत्नीला आज संपवायचे, याची पूर्ण तयारी करून आलेल्या पतीने सोमवारी पत्नीचा कोयत्याने वार करून खून केला. खून करून आरोपी फरार झाला होता. नंतर स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या कार्यालयात हजर झाला. मंगळवारी त्याला वडगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
आरोपीचा रोहिणी हिच्याशी आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो मोटारसायकल मॅकेनिक होता. त्यांना आठ व चार वर्षांच्या दोन मुली आहेत. आई रोहिणी हिची हत्या, तर वडिलांना अटक झाल्याने दोन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत.