कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर एक तसेच आरक्षणावर एक अशा दोन तक्रारी बुधवारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. दिनांक ४ जानेवारीपर्यंत अशा तक्रारी स्वीकारण्याकरिता ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमक्ष नुकतीच प्रारुप प्रभाग रचना सादर करण्यात आली. ६० प्रभागांवर थेट आरक्षण, तर केवळ २१ प्रभागांवर सोडत पध्दतीने आरक्षण टाकण्यात आले. त्याअनुषंगाने सोमवारी अधिकाऱ्यांसमोर अनेक तक्रारी करण्यात आल्या. तेव्हा लेखी तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
तक्रारी करण्याच्या पहिल्याच दिवशी केवळ दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मंदार कमलाकर जगदाळे यांनी प्रभाग क्रमांक ४०, दौलतनगर व प्रभाग क्रमांक ६४ संदर्भात तक्रार केली आहे. या दोन प्रभागात लोकसंख्या कमी - जास्त करुन प्रभाग तयार करण्यात आले आहेत, ते चुकीचे आहे, असे जगदाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रभाग क्रमांक ४० मध्ये जाेडलेला जादा भाग हा प्रभाग क्रमांक ६४ मध्येच ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरी तक्रार राकेश बबन सावंत यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक १५ हा अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. परंतु या प्रभागात ८० टक्के लोक मागास वर्गीय आहेत. त्यामुळे अभ्यासपूर्वक हा प्रभाग मागास वर्गीयांसाठी आरक्षित करावा, असे त्यांनी म्हटले आहे.