Kolhapur: तुझा मोबाईल नंबर दे, नाहीतर चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करीन; मुलीला धमकी दिल्याप्रकरणी दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:17 IST2026-03-13T12:17:27+5:302026-03-13T12:17:50+5:30
मानसिक दडपणाखाली असलेल्या मुलीने घडला प्रकार घरी सांगितला. याप्रकरणी रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल

संग्रहित छाया
हुपरी : हातकणंगले तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा मोटारसायकलने पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी दोघांवर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंद्रजित मातमारे (वय २६) व साथीदार यश ऊर्फ विश्वजीत सांगले (२५) अशी त्यांची नावे असून रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी व अल्पवयीन मुलगी एकाच गावातील आहेत. पीडित मुलगी शाळेत जाताना व कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर आरोपी पाठलाग करत असत व तुझा मोबाईल नंबर मला दे आणि माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह कर म्हणायचे व असे न केल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करण्याची धमकी द्यायचे.
त्यामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली असलेल्या मुलीने घडला प्रकार घरी सांगितला. रात्री उशिरा बाबू बाबासाहेब सूर्यवंशी (वय ४२) यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पीएसआय प्रसाद कोळपे करीत आहेत.
पोलिस ठाण्याबाहेर तणाव
रात्री उशिरा या प्रकरणी पोलिस ठाण्याच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणातील मुलीचे मामा व गावातील माजी सरपंच यांच्या अंगावर काही तरुण धावून गेले. त्यातून जोरदार खडाजंगी उडाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.