Kolhapur: ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड, शिक्के तयार करणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:21 IST2025-09-30T16:21:12+5:302025-09-30T16:21:12+5:30
फसवणूक प्रकरणात सहभाग, पोलिस कोठडीत रवानगी

Kolhapur: ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड, शिक्के तयार करणारे दोघे अटकेत
कोल्हापूर : पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड आणि शिक्के तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी आणखी दोघांना सोमवारी (दि. २९) अटक केली.
लेटरपॅड तयार करून देणारा किशोर मनोहर माने (वय ५०, रा. वळिवडे, ता. करवीर) आणि बनावट शिक्के तयार करून देणारा विश्वास यशवंत पाटील (३५, रा. बोलोली पैकी विठ्ठलाईवाडी, ता. करवीर) यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी निरंजन दिलीप गायकवाड याला बुधवारी (दि. २४) अटक झाली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करताना निरंजन गायकवाड याने पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरपॅड वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गायकवाड याच्या चौकशीतून बनावट लेटरपॅड तयार करून त्याच्या प्रिंट देणारा किशोर माने याचे नाव समोर आले.
तसेच विश्वास पाटील याने शिक्के तयार करून दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. बनावट लेटरपॅड आणि शिक्के तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य दोघांकडून जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.