अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी प्रयत्न करणार

By Admin | Updated: August 30, 2015 00:58 IST2015-08-30T00:58:52+5:302015-08-30T00:58:52+5:30

पी. शिवशंकर : मेजर ध्यानचंद जयंती व क्रीडादिन कार्यक्रम ; यशस्वी खेळाडूंचा सत्कार

Try for astrotrf | अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी प्रयत्न करणार

अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर : कोल्हापूरची हॉकी परंपरा मोठी असून, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे अ‍ॅस्ट्रोटर्फ बसवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त अर्थात क्रीडा दिनप्रसंगी ते शनिवारी सकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवशंकर म्हणाले, कोल्हापुरात हॉकीसाठी कार्यरत असणारी संस्था आणि शहरातून राष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू पाहिले की, या खेळाडूंना आणखी सुविधा दिल्यास हे खेळाडू नक्कीच कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार नक्कीच नेतील. त्यांच्याकरिता महापालिकेकडून जी सुविधा देता येईल, ती सुविधा दिली जाईल. याशिवाय शासनाकडे या मैदानावर अ‍ॅस्ट्रोटर्फ कृत्रिम हिरवळ बसविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निकाता प्रभू (जलतरण), कुणाल पारकर(शूटिंग), नंदिनी साळोखे (कुस्ती), राजवर्धन नाईक (जलतरण), युगंधरा शिर्के (जलतरण), करुणा पाटील (तायक्वोंदो), अक्षय देशमुख (हँडबॉल), अवधूत परुळेकर (जलतरण), श्वेता पाटील (हॉकी), रमा पोतनीस (हॉकी), रेवती पाटील (वुशू), केतन जावळे (हॉकी), वीरधवल जाधव (फुटबॉल), आकाश पोवार (बेल्ट रेसलिंग), गणेश पाटील (हॉकी), प्राजक्ता किडगावकर (हॉकी), सृष्टी नलवडे (कुस्ती) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे, कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय-सरदार साळोखे, उपाध्यक्ष कुमार आगळगावकर, अनिल मुळे, नजीर मुल्ला, नगरसेवक दिलीप भुर्के, भूपाल शेटे, जगमोहन भुर्के, अनिल परांडेकर, दत्ता सोळंकी, मनपा क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सागर जाधव, बालाजी केंद्रे, एल. जी. पवार, मोहन भांडवले, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )

Web Title: Try for astrotrf