रंगांच्या उधळणीत हुल्लडबाजी; कोल्हापुरात तीन लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:15 IST2026-03-09T12:15:21+5:302026-03-09T12:15:48+5:30
पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाया

रंगांच्या उधळणीत हुल्लडबाजी; कोल्हापुरात तीन लाखांचा दंड वसूल
कोल्हापूर : शहरात रंगांची उधळण करताना हुल्लडबाजी करणाऱ्या ३७० वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना तीन लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारला. रविवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. नाकाबंदी आणि कारवायांमुळे गैरप्रकारांना आळा बसला.
रंगपंचमीला हुल्लडबाजी करून रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार शहर वाहतूक पोलिसांनी शहरात २२ ठिकाणी वाहनांच्या तपासणीसाठी बंदोबस्त तैनात केला होता. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने हुल्लडबाज वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या.
ट्रीपल सीट, विनालायसन, कर्कश्श हॉर्न, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनचालकांसह मोबाइलवर बोलत आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाया केल्या. दिवसभरात शहरात ३७० वाहनधारकांकडून तीन लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात काही हुल्लडबाजांना पोलिसांनी पिटाळून लावले.
प्रमुख चौकांमध्ये दिवसभर पोलिस तैनात असल्याने भरधाव गाड्या पळवणे, दोन गटांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडले नाहीत, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यामुळेही रस्त्यांवर तुरळक गर्दी होती.
अशा केल्या कारवाया
गुन्हा - कारवाया - दंड
- ट्रीपल सीट - १४० - एक लाख ४० हजार
- विनालायसन - ७८ - ५८ हजार
- मोबाइलचा वापर - २८ - २९ हजार
- फॅन्सी नंबरप्लेट - २४ - १९ हजार
- कर्कश्श हॉर्न - ९ - पाच हजार
- इतर - ७३ - ५६ हजार