Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:42 IST2025-10-01T17:40:30+5:302025-10-01T17:42:02+5:30
दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडे नवमीला आज, बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा बांधण्यात आली. तसेच खंडेनवमीनिमित्त अंबाबाईच्या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता आहे.
अष्टमीला झालेल्या जागराच्या होममुळे बुधवारी अंबाबाईचे मंदिर सकाळी साडेआठनंतर उघडले. अंबाबाईचा अभिषेक, आरती झाल्यानंतर भैरवी मातारूपात देवीची पूजा बांधण्यात आली.
हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रखर तेजस्वी वर्ण आहे, जिच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे, रक्तचंदनरंजित जिच्या चारही हातात जपमाळा, ग्रंथ, अभय व वरदहस्त शोभत आहेत, जी त्रिनेत्री असून, मंदस्मित मुखमंडल आहे.
जेव्हा महाकाली माता स्वतः मूळ रूपात व्यक्त होण्याच्या इच्छेने, काही काळ गुप्त झाली. तेव्हा शिवांनी कालीमातेला शोधण्यासाठी देवर्षी नारदांना आज्ञा केली, शिवाज्ञेनुसार नारदांना सुमेरू पर्वताच्या उत्तरेस श्री देवीमाता दिसली, तेव्हा तिच्यासमोर नारदांनी शिवांशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तिच्या शरीरातून एका सुकोमल, तेजस्वी षोडशवर्षी युवती प्रगट झाली, श्री काली मातेच्या शरीरातून व्यक्त झालेल्या, या छायाविग्रहास ‘त्रिपुरभैरवी’ म्हणतात. श्री दक्षिणामूर्ति अथवा श्री बटुकनाथ हे हिचे भैरव आहेत, मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रगट झालेली, ही देवी श्रीकुलातील असून, उत्तराम्नायपीठस्था आहे.
त्रिपुरभैरवी, कोलेशीभैरवी, रुद्रभैरवी, चैतन्यभैरवी, क्रियाभैरवी, सिद्धिभैरवी, कामेश्वरीभैरवी, षट्कुटाभैरवी इ. या देवीचे उपासनाभेद व प्रकार आहेत. हिच्या उपासनेने संकटनाश, इंद्रियविजय, सर्वत्र उत्कर्ष प्राप्ती, शत्रुनाश, सकलसिद्धिलाभ, आरोग्यप्राप्ती, सौख्यलाभ इ. लाभ होतात.