अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाचा आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:39+5:302020-12-09T04:20:39+5:30
कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेश निश्चित करण्याचा आज, बुधवार अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत कला, वाणिज्य, ...

अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाचा आज अखेरचा दिवस
कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेश निश्चित करण्याचा आज, बुधवार अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या एकूण ४४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग उद्या, गुरुवारपासून भरणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांत प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये पहिल्या दिवशी ६६२, दुसऱ्या दिवशी १०३३, तिसऱ्या ११२२, चौथ्या ११२३, तर पाचव्या दिवशी मंगळवारी ५४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यात विज्ञान शाखेचे २२६, वाणिज्य (इंग्रजी) ८७, वाणिज्य (मराठी) १४५, कला (मराठी) ७४ आणि कला (इंग्रजी) शाखेत १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या फेरीत प्रवेश घेण्याची आज, बुधवारी अखेरची मुदत आहे. त्यानंतर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे वर्ग उद्या, गुरुवारी भरणार आहेत. पहिल्या फेरीत प्रवेशित झाले नसलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून जाहीर केले जाणार असल्याची माहिती या समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
आतापर्यंत शाखानिहाय झालेले प्रवेश
विज्ञान : २१२१
वाणिज्य (इंग्रजी) : ७०७
वाणिज्य (मराठी) : ९०३
कला (मराठी) : ६९८
कला (इंग्रजी) : ५८
चौकट
‘दूरशिक्षण’च्या प्रवेशासाठी मुदतवाढ
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे.