व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:48 IST2019-03-01T13:46:13+5:302019-03-01T13:48:15+5:30
गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मूलभूत सुविधांसाठी काम केले. आता २०१९ ते २०२४ हा कालावधी आकांक्षापूर्तीचा असेल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गुरुवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (छाया- नसीर अत्तार )
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मूलभूत सुविधांसाठी काम केले. आता २०१९ ते २०२४ हा कालावधी आकांक्षापूर्तीचा असेल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गुरुवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये दुपारी साडेबारानंतर या संवाद उपक्रमाला सुरुवात झाली. देशभरातील विविध राज्यांतील प्रमुख शहरांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना यामध्ये प्रश्न विचारण्याची मुभा दिली होती. महाराष्ट्रातील पुण्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांनी हा संवाद ऐकण्यासाठी गर्दी केली होती.
वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देताना मोदी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा घरांच्या संपर्कात राहावे. त्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यावी. मी स्वत: जेव्हा ‘आयुष्यमान भारत’मधील लाभार्थ्यांशी बोलतो तेव्हा मलाच त्यांच्याकडून प्रेरणा मिळते.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा विचार करता, प्रत्येकाने आपले काम प्रामणिकपणे करणे महत्त्वाचे ठरते. देश आता नव्या नीतीने आपल्या क्षमतांचा विस्तार करीत आहे. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा आपली अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. ती आता सहाव्या क्रमांकावर आली आहे. पुढील काळात ती पहिल्या तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहराध्यक्ष संदीप देसाई, आर. डी. पाटील, अशोक देसाई, अॅड. संपतराव चव्हाण, महानगरपालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, जयश्री जाधव, चंद्रकांत घाटगे, अमित पालोजी, हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, शंतनू मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.