Kolhapur: आजारी आईला बघायला पत्नीसह मुलीला घेवून दुचाकीवरुन निघाले, ट्रकला समोरासमोर झालेल्या धडकेत तिघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:48 IST2026-02-19T12:46:30+5:302026-02-19T12:48:11+5:30
त्या दोन मुलांचे छत्र हरपले

Kolhapur: आजारी आईला बघायला पत्नीसह मुलीला घेवून दुचाकीवरुन निघाले, ट्रकला समोरासमोर झालेल्या धडकेत तिघे ठार
शिरगुप्पी/जयसिंगपूर : जमखंडी-मिरज या आंतरराज्य मार्गावरील अलकनूर (ता. रायबाग) जवळ असलेल्या करीसिद्धेश्वर देवस्थानाच्या वळणावर जमखंडी येथून मिरजकडे जाणाऱ्या मालट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर एकट्याचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
जयसिंगपूर येथील खासगी संस्थेत कामास असलेले गिर्याप्पा कुद्रोळी हे पत्नी व मुलीला घेऊन आईची तब्येत पाहण्यासाठी जमखंडीकडे जात असताना हा अपघात झाला असून याची नोंद हारुगिरी पोलिस स्थानकात झाली.
गिऱ्याप्पा कुद्रोळी (वय ३८), मंजुळा कुद्रोळी (वय २८), आराध्या कुद्रोळी (वय ७) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात गिऱ्याप्पा कुद्रोळी यांची पत्नी मंजुळा कुद्रोळी व त्यांची मुलगी आराध्या कुद्रोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर गिऱ्याप्पा कुद्रोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी हारुगिरी येथील खासगी रुग्णालयाकडे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
त्या दोन मुलांचे छत्र हरपले
जयसिंगपूर येथील शाहूनगर परिसरात कुद्रोळी कुटुंबीय राहायला होते. गिऱ्याप्पा यांची आई आजारी असल्याने पत्नी मंजुळा व मुलगी आराध्यासमवेत ते दुचाकीवरून बुधवारी सकाळी जमखंडीला गेले होते. सातवीत शिकणारा प्रीतम, तर दहावीत शिकणारा किशन या दोन मुलांना शाळेला पाठवून कुद्रोळी कुटुंबीय गेले होते. अपघातात पती, पत्नीसह चिमुरड्या आराध्याचाही अंत झाला. त्यामुळे दोन्ही मुलांचे छत्र हरपल्याच्या भावना यानिमित्ताने व्यक्त झाल्या. गिऱ्याप्पा व त्यांची पत्नी मंजुळा हे दोघेजण खासगी नोकरी करीत होते.