Kolhapur Accident: प्रखर पांढरा लाईट डोळ्यांवर पडला अन् कारचालकाचे नियंत्रण सुटले; क्षणात तिघांचा बळी घेतला
By उद्धव गोडसे | Updated: January 2, 2026 12:47 IST2026-01-02T12:45:23+5:302026-01-02T12:47:26+5:30
निष्पापांच्या बळीने हळहळ

Kolhapur Accident: प्रखर पांढरा लाईट डोळ्यांवर पडला अन् कारचालकाचे नियंत्रण सुटले; क्षणात तिघांचा बळी घेतला
उद्धव गोडसे
कोल्हापूर : समोरून आलेल्या कारचा प्रखर पांढरा लाईट डोळ्यांवर पडला अन् डोळ्यांसमोर अंधारी येऊन कारवरील नियंत्रण सुटले. गोंधळून ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने काही कळायच्या आत अपघात झाला, अशी कबुली कारचालकाने शाहूपुरी पोलिसांकडे दिली. उलट्या दिशेने होणारी वाहतूक आणि प्रखर पांढऱ्या लाईटमुळे निष्पाप तीन लोकांचे बळी गेले. अर्थात, कारचालकाचा निष्काळजीपणाही कारणीभूत आहेच. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तावडे हॉटेल येथे झालेल्या अपघाताने वाहतूक सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी आवरून पहाटे कराडच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारचालकाने तावडे हॉटेल येथे शेकोटीला थांबलेल्या चौघांना चिरडले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. कारचालक मुकेश अरुण अहिरे (वय २९, सध्या रा. कारंडे मळा, कोल्हापूर, मूळ रा. मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट झाले.
वाचा : नववर्षाच्या स्वागतालाच कोल्हापूर जिल्ह्यात चार अपघात; सहा ठार, दोघे जखमी
तो तावडे हॉटेल येथून महामार्गाच्या दिशेने वळताच समोरून उलट्या दिशेने आलेल्या कारचा प्रखर पांढरा लाईट त्याच्या डोळ्यांवर पडला. रात्रीचे जागरण, दारूच्या नशेची झिंग आणि त्यातच डोळ्यांवर पडलेल्या प्रखर लाईटमुळे तो गोंधळला. डोळ्यांसमोर अंधारी येताच नियंत्रण सुटून गोंधळात ब्रेकऐवजी त्याचा पाय एक्सलेटरवर पडला. स्टेअरिंग डाव्या बाजूला वळून थेट रस्त्याकडेला शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांच्या अंगावरून कार गेली. कारचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
सुरक्षेबद्दल प्रश्न
या अपघाताने वाहनांच्या प्रखर पांढऱ्या लाईटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक ठिकाणी प्रखर पांढरा लाईट अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याच्या वापराबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. महामार्गांवर उलट्या दिशेने होणारी वाहतूक किती धोकादायक असते ते पुन्हा स्पष्ट झाले. वाहनचालकांची बेफिकिरीदेखील अपघातातून स्पष्ट झाली. जागरण, नशा, भरधाव वेग यावर नियंत्रण नसेल तर असे अपघात निष्पापांचे बळी घेतात.
मृत्यूने एकत्रच गाठले
तावडे हॉटेल येथील अपघातात ठार झालेले तिघे आयुष्यात पहिल्यांदाच एकत्र आले होते. थंडी जास्त असल्याने शेकोटीच्या निमित्ताने ते एका ठिकाणी जमले. काही वेळाने या तिघांनाही आपआपल्या कामांसाठी निघून जायचे होते. पण, अपघाताने त्यांचा जीवनप्रवास तिथेच संपवला. तिघेही त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. जन्मभर कधीच न एकत्र आलेल्यांना मृत्यूने मात्र एकत्रच गाठले.