हेल्मेट, रेनकोट घालून आले, चाकूचा धाक दाखवून २३ तोळे दागिने लुटले; कोल्हापुरातील उद्योजकाच्या बंगल्यात जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:13 IST2025-06-13T18:12:47+5:302025-06-13T18:13:06+5:30
जिल्ह्यात नाकाबंदी, सम्राटनगरातील घटना, दोन चोरट्यांचे कृत्य

हेल्मेट, रेनकोट घालून आले, चाकूचा धाक दाखवून २३ तोळे दागिने लुटले; कोल्हापुरातील उद्योजकाच्या बंगल्यात जबरी चोरी
कोल्हापूर : लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजू जयकुमार पाटील (वय ६०, रा. गोविंदराव हौसिंग सोसायटी, सम्राटनगर) यांच्या घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी २३ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले. हा प्रकार गुरुवारी (दि. १२) दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान घडला. भर दुपारी घडलेल्या जबरी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू पाटील, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून हे चौघे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कंपनीत गेले होते. पाटील यांचे व्याही (सुनेचे वडील) शीतल सौंदते (वय ८३) हे एकटेच बंगल्यात होते. बंगल्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता. दुपारी तीनच्या सुमारास बंगल्याचे मागील दार उघडून दोन चोरटे आत शिरले. त्यातील एकाने सौंदते यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसरा चोरटा थेट वरच्या मजल्यावर गेला.
कपाटांमधील साहित्य विस्कटून त्याने चीज वस्तू आणि रोकडचा शोध घेतला. कपाटातील दागिन्यांचे डिजिटल लॉकर चोरट्याच्या हाती लागले. लॉक निघत नसल्याने लॉकर पिशवीत घालून तो खाली आला. त्यानंतर दोघे मागील दरवाजाने निघून गेले. काही वेळात सौंदते यांनी फोन करून याची माहिती मुलगी आणि जावयास दिली. पाटील कुटुंबीयांनी तातडीने घराकडे धाव घेऊन पाहणी केली असता, २३ तोळे दागिन्यांच्या डिजिटल लॉकरची चोरी झाल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण सहकाऱ्यांसह पाटील यांच्या बंगल्यात पोहोचले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात फारसे यश आले नाही. भर दुपारी झालेल्या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
हेल्मेट अन् रेनकोट
काळ्या रंगाचे हेल्मेट, रेनकोट आणि स्पोर्ट् शूज घातलेले दोन चोरटे चंदेरी रंगाच्या मोपेडवरून आले होते. अवघ्या १५ मिनिटांत दागिन्यांची लूट करून ते पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात नाकाबंदी
लूट करून पळालेल्या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांचे वर्णन सर्व पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले आहे. राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कामगारांकडे चौकशी सुरू
पाटील यांच्या घरात पाच पुरुष आणि तीन महिला कामगार आहेत. यातील तिघांकडे चौकशी सुरू आहे. चोरट्यांनी आजोबा सौंदते यांना कोणतीही इजा केली नाही. चोरटा थेट दागिने असलेल्या खोलीत पोहोचला. यावरून दोन्ही चोरट्यांना पाटील यांच्या घराची माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळेच पाटील यांच्या घरातील कामगारांची चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.