Kolhapur: विनाशिक्षिका शाळांमध्येही मुलींशी होणार संवाद, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली दखल
By समीर देशपांडे | Updated: September 13, 2025 12:47 IST2025-09-13T12:46:56+5:302025-09-13T12:47:19+5:30
जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता

Kolhapur: विनाशिक्षिका शाळांमध्येही मुलींशी होणार संवाद, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली दखल
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील ७०० प्राथमिक शाळा या विनाशिक्षिका असून या शाळांमधील मुलींनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उपस्थित केला होता. याची दखल घेत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारच्या बैठकीत याबाबत पर्याय काढण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांना सूचना केल्या. त्यानुसार आठवड्यातून किमान एखादा दिवस या मुलींशी संवाद साधण्यात येणार असल्याचा उपक्रम कोल्हापूरजिल्हा परिषद राबवेल, असे कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९५८ शाळांपैकी तब्बल ७०० शाळांमध्ये शिक्षिका नाहीत. त्यामुळे अनेकवेळा शाळेतील मुलींना त्यांच्या आरोग्यापासून ते वैयक्तिक अनुभवाविषयी बोलायचे असेल तर शिक्षकांशी बोलताना मर्यादा येतात. आपल्या बाईंशी एखादी विद्यार्थिनी जितक्या मोकळेपणाने बोलू शकेल तसे शिक्षकांबाबत होऊ शकत नाही. शिक्षिकांच्या व्यक्तिमत्त्वाचाही मोठा प्रभाव मुलींवर होत असतो. त्यामुळेच हा विषय शुक्रवारच्या अंकामध्ये ‘लोकमत’मधून मांडला होता. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.
वाचा- शिकायचं, मागच्या बाकावर नाही बसायचं; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘नो मोर बॅक बेंच’ संकल्पना
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ या शुक्रवारीच कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होत असल्याने त्यावर थेट नियंत्रण नसल्याची वस्तुस्थिती सांगण्यात आली. तेव्हा मिसाळ यांनी पर्याय काढण्याची सूचना कार्तिकेयन यांना केली. त्यानुसार आठवड्यातून एकदा शनिवारी त्या ठिकाणी एक तास या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, असे कार्तिकेयन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तर राज्यात असा निर्णय घेणारा पहिला जिल्हा कोल्हापूर
राज्यातील सर्वच जिल्ह्यात अशा पद्धतीने विनाशिक्षिका हजारो शाळा आहेत. जर कोल्हापूर जिल्हा परिषदेने या विनाशिक्षिका शाळा असलेल्या शाळांमध्ये मुलींशी साप्ताहिक संवाद उपक्रमाला सुरुवात केली तर असा उपक्रम राबविणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.