Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:51 IST2025-01-23T18:49:37+5:302025-01-23T18:51:31+5:30
जानेवारीतच थेंबसुद्धा नाही, चौकशी करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

Kolhapur: वन्यप्राण्यांना पाणी पाण्यासाठी दहा लाख खर्चून बंधारे बांधले, वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : वनहद्दीत वन्यप्राण्यांनी पाण्याची सहज उपलब्धतास व्हावी, या उद्देशाने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील ब्राह्मणाच्या खोरीतील ओढ्याला घातलेल्या बंधाऱ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने बंधाऱ्याच्या कामाबाबत निसर्गमित्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. हिवाळ्यातच बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट असल्याने वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर उभारलेला बंधाऱ्याचा प्रयोग फसला असल्याची चर्चा आहे. दहा लाख खर्चून बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे की पाणी साठविण्याची जागा चुकीची निवडली, याची सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.
एप्रिल २०२४ मध्ये पन्हाळा वनविभागाने पोर्ले तर्फ ठाणे, पडसाळीसह पोंबरे येथे ३० लाख रुपये खर्चून तीन बंधारे बांधले होते. पोंबरे आणि पडसाळी येथील ओढ्यांना पाण्याचा स्रोत असल्याने ते बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत; परंतु पोर्ले तर्फ ठाणे येथील बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचून राहिलेला नाही. त्यामुळे वर्षापूर्वीच कामाचे पितळ उघडे पडले आहे.
पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधताना ओढ्याला पाण्याचा स्राेत आहे की नाही, असेल तर तो किती दिवस राहील? याची शहानिशा न करता वनविभागाने निवडलेली जागा चुकीची आहे की जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी मुरवण्यासाठी बंधारा बांधण्याची उचापत पन्हाळा वनविभागाने केली, असा सवाल निसर्गमित्राने केला आहे. या बंधाऱ्यात पाणी का साचले नाही, बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा खराब आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संबंधित विभागाने सखोल चोकशी करावी, अशी मागणी निसर्गमित्रांनी केली आहे.
तालुक्यातील पडसाळी आणि पोंबरे येथे बांधलेले बंधारे पाण्याने भरलेले आहे. पोर्लेच्या बंधाऱ्यातील पाणी डिसेंबरपर्यत होते. बंधाऱ्याला गळती नाही तरीसुद्धा बंधाऱ्यात पाणी साचलेले नाही. पाणी कशामुळे साचलेले नाही, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. - अनिल मोहिते, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी
वनविभागाने बंधारे बांधताना स्थानिक लोकांना विचारात घेणे गरजेचे होते. त्यांनी निवडलेली जागा चुकीची आहे. दीर्घकाळ पाण्याचा स्राेत असणार ओढा डावलून मुरूम खुदाईमुळे विस्तीर्ण झालेल्या ओढ्यावर बंधारा बांधला आहे. मुरमाच्या जमिनीवर बंधारा बाधून १० लाखांचा निधी पाण्याबरोबर मुरविण्याचे काम वनविभागाने केले आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. - दिनकर चौगुले, निसर्गमित्र, पोर्ले/ ठाणे, ता. पन्हाळा