Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:39 IST2025-09-29T13:36:15+5:302025-09-29T13:39:39+5:30
देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळा

Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात पहिल्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा होतो. देवीची उत्सवमूर्ती रोज रात्री साडेनऊ वाजता पालखीत विराजमान होते, मग चोपदाराची ललकारी होताच ही पालखी नगर प्रदक्षिणेस निघते. ज्या ज्या मार्गावरून पालखी जाते, त्या त्या मार्गावर पालखीपुढे सेवेकऱ्यांकडून पायघड्या घातल्या जातात. जवळपास शंभराहून अधिक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळा
म्हणजेच नगर प्रदक्षिणा सोहळा. पंचमीच्या दिवशी कोल्हासुराचा संहार झाल्यानंतर सर्व व्यवस्थित आहे, घाबरू नका हे सांगण्यासाठी देवी करवीरच्या सर्व भाविकांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडते. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडपात तुळजाभवानी देवीची भेट, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वारमार्गे पुन्हा मंदिर या जुन्या वाटेवरून देवी प्रदक्षिणा घालते. ९ दिवस रोज देवीच्या पालखीसमोर पायघड्या घालण्याचा मान पूर्वी परीट गल्लीतील मानकऱ्यांकडे होता. आता यात सारे भाविक सहभागी झाले आहेत.
पायघड्यांसाठी पांढरे शुभ्र कापड
प्रदक्षिणेच्या मार्गावर घातल्या जाणाऱ्या या पायघड्यांसाठी ११ मीटरचे मांजरपाटाचे कापड लागते. गेल्या अनेक पिढ्या या पायघड्या घालण्यासाठी राजू मेवेकरी यांच्याकडे वारसाने हा मान आहे. श्री महालक्ष्मी भक्त मंडळाकडे ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा १० ते १२ पायघड्या आहेत. ॲड. तन्मय मेवेकरी, सुनील खडके, धनंजय वाठारकर, प्रशांत जोशी, वसंत वाठारकर, संजय फलटणकर, ऋतुराज सरनोबत, आदित्य मेवेकरी यांच्यासह १८ वर्षापासून ६० वर्षांपर्यंतचे शंभरावर भाविक ही सेवा देतात.
ललिता पंचमीला परतताना पायघड्या
मंदिर प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणेचा मार्ग वगळता वर्षातून फक्त एकदाच ललिता पंचमीला अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिराचा परीघ सोडून भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी टेंबलाईला भेटण्यासाठी बाहेर पडते. परतताना टेंबलाई, टाकाळा, शाहू मिल चौक, उमा टॉकीज, बिंदू चौक, जुना राजवाडामार्गे अंबाबाई मंदिरापर्यंत पालखीसमोर सेवेकरी १० ते १२ किलोमीटर पायघड्या घालतात. पांढऱ्या रंगाचे ११ मीटरचे एक याप्रमाणे २५ मांजरपाटाच्या पायघड्या सेवेकऱ्यांकडे आहेत. प्रत्येक सेवेकऱ्याला श्रीपूजकांमार्फत श्रीफळ देउन सन्मानित केले जाते.