राज्याची हवा बिघडली; कोल्हापूरची सुधारली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:38 IST2025-11-18T18:37:55+5:302025-11-18T18:38:48+5:30
दोन संस्थांच्या पाहणीचा अहवाल

राज्याची हवा बिघडली; कोल्हापूरची सुधारली, पण...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : ''वातावरण फाउंडेशन'' आणि ‘एन्वारोकॅटलिस्ट’ यांच्यातर्फे प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्रातील शहरांमधील वातावरणीय वायूची गुणवत्ता स्थिती" या अहवालातून राज्यातील हवेच्या गुणवत्तेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे, मात्र, त्यात कोल्हापूरची आकडेवारी समाधानकारक आहे. कोल्हापूरमध्ये २०१९-२० च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये धूलिकणांची पातळी (PM₁₀) कमी झाली आहे.
राज्यातील २०२४-२५ मध्ये निम्म्याहून अधिक शहरांमध्ये ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकां’पेक्षा (एनएएक्यूएस) धूलिकणांची पातळी (PM₂.₅) जास्त आढळली असून, सर्वच शहरांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त धूलिकण (PM₁₀) आढळून आले आहेत.
''केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा''च्या ‘हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रा’च्या सलग आठ वर्षांच्या आकडेवारीवर "महाराष्ट्रातील शहरांमधील वातावरणीय वायूची गुणवत्ता स्थिती" हा अहवाल आधारित आहे. त्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रदूषणात मोठी वाढ होते आणि केवळ पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरुपात त्यामध्ये घट होते.
२०२४-२५ मध्ये सर्वेक्षण केलेल्या सर्व शहरांमध्ये PM₁₀ साठी ''राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता मानकां''चे (‘एनएएक्यूएस’ - वार्षिक सरासरी ६० µg/m³) उल्लंघन झाले आहे तसेच त्यांनी २०२४-२५ साठी ‘एनसीएपी’ची उद्दिष्टे देखील पूर्ण केलेली नाहीत. २०२४-२५ मध्ये PM₁₀ प्रदूषणाच्या बाबतीत जळगावमध्ये सर्वाधिक (११० µg/m³) पातळीची नोंद झाली. सांगलीमध्ये सर्वांत कमी PM₂.₅ (२८ µg/m³) आणि PM₁₀ (७५ µg/m³) पातळी आढळली.
कोल्हापुरात २४.११ कोटी निधी खर्च
''राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्या''तील उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ही योजना २०१९ पासून सुरू आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत २४.११ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.