स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:28 IST2026-03-04T12:26:59+5:302026-03-04T12:28:48+5:30
सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले

स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार
हुपरी : सहलीसाठी दुबईला गेलो, पाच दिवस आनंदात गेले. मात्र शनिवारपासून आम्ही राहिलेल्या हॉटेलच्या परिसरात धुराचे लोट पसरले. विमानतळ एक किलोमीटर होते. हवाई हल्ले सुरू झाले. मिसाइल हवेतच नष्ट होत होते. मात्र, सकाळी दात घासताना मोठा आवाज झाला आणि पोटात गोळा उठला. शंभर फुटांवर मिसाईलचे अवशेष पडल्याने आम्ही घाबरलो होतो, असा थरारक अनुभव हुपरीतील जोतिबा कणसे आणि राजेंद्र हातकर यांनी सांगितला. दुबईत अडकलेला २५ जणांचा ग्रुप मंगळवारी हुपरीत परतला. यानंतर अनेकांनी आँखो देखा हाल सांगितला.
या पर्यटकांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीवर संकटांचे ढग दाटून आले होते. सकाळी ७ वाजता समोर ड्रोनचा हल्ला झाला अन् धुराचे लोट पसरले. दुपारी १२ वाजता जेवायला जाताना पुन्हा हल्ला झाला, पाचशे फुटांवर अवशेष पडले आणि मनात हुरहूर सुरू झाली. सायंकाळी ४ वाजता आणि पहाटे ४ वाजता मोठा आवाज झाला. भीतीने गाळण उडाली. पोरंबाळं सोबत आहेत, पुढे काय होणार, असे विचार येऊ लागले.
स्थानिक प्रशासनाने हायअलर्ट जारी केला होता. रात्री काळजाची धडधड वाढली. आणीबाणीचे संदेश यायला सुरुवात झाली. ‘आहात तिथेच सुरक्षित रहा, बाहेर पडू नका, घाबरू नका’, असे प्रशासनाचे आवाहन होते, आणि आम्ही देवाची प्रार्थना सुरू केली. विमानतळावर हल्ला झाल्याने दुबईतील उड्डाण बंद झाले होते. स्थानिक प्रशासनाने हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुर्ज खलिफा परिसरातील हॉटेल रिकामी केली होती. तेथील सरकारने बाहेरील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
वाचा : आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले
आम्ही ग्रुपमधील पंचवीसजण एकमेकांना धीर देत राहिलो. घरातील लोकांना परिस्थितीची माहिती दिली. शिवसेनेचे पक्ष प्रतोद रोहित शेटे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी ही बाब तत्काळ खासदार धैर्यशील माने यांना सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क सुरू झाला. कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी संबंधित विभागाचा पाठपुरावा केला. अबुधाबी येथील विमान वाहतूक सुरू झाली. रात्री स्थानिक वेळेनुसार साडेचार वाजता तेथून पहिलेच विमान भारताच्या दिशेने उड्डाण केले आणि आम्ही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले. याचे भारतीय मूल्य २६ हजार रुपये इतके होते. रात्री साडेआठच्या सुमारास मुंबईत पोहोचलो आणि आनंदाने भारावून गेलो. पहाटे हुपरी शहरात दाखल झालो. हा क्षण अविस्मरणीयच क्षण आहे.
२५ जणांचा ग्रुप
जोतिराम कणसे, कमल कणसे, शीतल बारगे, जयश्री बारगे, समरजीत बारगे, तुकाराम राऊत, छाया राऊत, राजेंद्र हतकर, सुनीता हतकर, बाळासाहेब हतकर, सुमन हतकर, विजय धनवडे, मंगल धनवडे, प्रशांत माळी, प्रियांका माळी, श्रीहरी माळी, प्राजक्ता माळी सर्व रा. हुपरी, प्रकाश जाधव, सविता जाधव रा. पट्टणकोडोली, राजेंद्र अडविकोट, कांचन अडविकोट, सुरेश दराडे, निर्मला दराडे रा. पुणे हे यात्रेकरू दुबईत अडकले होते.