‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:33 IST2025-12-01T11:50:32+5:302025-12-01T12:33:41+5:30
केवळ आश्वासने देत नाही तर ती दिलेली आश्वासने जबाबदारीने पूर्ण करतो

‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
चंदगड : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असा गैरसमज विरोधकांनी जनतेत पसरवला. मात्र, मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही. रोजगाराच्या माध्यमातून १ कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे. जनतेच्या समर्थनामुळेच ‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगड तालुक्यातून वळवला असून, कोणत्याही परिस्थितीत तो मार्गी लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
येथील नगरपंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रस्ते विकासामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यामुळेच तुमच्या मागणीवरून विकासाचा शक्तिपीठ मार्ग चंदगडमधून वळविला असून, येथे लाॅजिस्टिक पार्क, एमआयडीसी देऊन उद्योग उभारू. तसेच आमदार शिवाजी पाटील यांच्या कल्पनेतील पर्यटन हब तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.
वाचा : शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा
राज्यात बहुमताने महायुती सरकार आल्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद होणार अशा वावड्या उठविल्या, पण मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होऊ देणार नाही. हेरे सरंजामचा प्रश्न मार्गी लावू तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय चंदगडला मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, नाथाजी पाटील, दिग्विजय देसाई यांची भाषणे झाली.
आमदार शिवाजी पाटील यांनी स्मार्ट चंदगड, धनगरवाड्यांचे स्थलांतर, आयुष्मान हाॅस्पिटल, दौलत साखर कारखाना शेतकऱ्यांचा करावा व बेळगाव-वेंगुर्ले रस्ता १० मीटरचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संजय घाटगे, मानसिंग खोरोटे, अप्पी पाटील, नाथाजी पाटील, स्वाती कोरी, सुनील काणेकर, शिवसेनेचे विजय बलगुडे, आदी उपस्थित होते.
चंदगड पर्यटन हब बनावे...
आमदार शिवाजी पाटील म्हणाले, महाबळेश्वर, माथेरानपेक्षा चंदगड निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे चंदगडला पर्यटन हब बनविण्यासाठी निधी द्यावा. तसेच चंदगडमध्ये लॉजिस्टक पार्क, एमआयडीसीत नवे उद्योग आणावेत.
आश्वासने पूर्ण करतो
आपण केवळ आश्वासने देत नाही तर ती दिलेली आश्वासने जबाबदारीने पूर्ण करतो म्हणूनच, विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.