Kolhapur: हुपरीत नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव, रंगतदार लढतीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:15 IST2025-10-07T18:14:30+5:302025-10-07T18:15:07+5:30
आवाडे गटाच्या ताराराणी पक्षाचा मागील निवडणुकीत निसटता पराभव झाला होता

Kolhapur: हुपरीत नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव, रंगतदार लढतीचे संकेत
हुपरी : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. थेट नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे. लढत दुरंगी की तिरंगी याबाबत चर्चेचा खल सुरू असून, नगराध्यक्षपदाचा मानकरी कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आवाडे गटाच्या ताराराणी पक्षाचा मागील निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. आता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा देत या भागातील वर्चस्वाच्या लढाईसाठी पायाभरणी केली आहे. नगराध्यक्षपद खुले झाले असते तर इच्छुकांची संख्या वाढली असती. अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने हा तिढा आपोआपच सुटला आहे. यावेळी एक प्रभाग वाढल्याने तीन नगरसेवक वाढले आहेत. यामुळे प्रभागातील उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी सर्वच पक्षांना काही अंशी मदत होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधून आरपीआयचे राज्य सचिव व माजी सरपंच मंगलराव माळगे, माजी बांधकाम सभापती सूरज बेडगे, माजी नगरसेविका शीतल किरण कांबळे, माजी नगरसेविका अनिता मधाळे दावा करू शकतात. महाविकास आघाडीतून बुरुड समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे, माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे, रमेश भोरे यांची नावे चर्चेत आहेत.