कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत रस्त्यावर वाढली ७ हजारांवर दुचाकी, चारचाकी वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:02 IST2026-01-02T18:02:20+5:302026-01-02T18:02:52+5:30
ईलेक्टिक वाहनांच्या संख्येतही वाढ

संग्रहित छाया
सचिन यादव
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२४ च्या तुलनेत ७ हजार १२५ वाहनांची संख्या वाढली आहे. २०२४ मध्ये ६३ हजार ६७६ वाहनांची नोंदणी झाली होती. २०२५ मध्ये ही संख्या ७० हजार ८०१ इतकी झाली आहे. तर ईलेक्ट्रिक वाहनांना कोल्हापूरकरांनी पसंती दिली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३ हजार २२७ वाहने वाढली आहेत. जिल्ह्यात २०२५ मध्ये ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या ११ हजार १७ इतकी झाली आहे.
नवीन वर्षात, विशेषतः २०२५ मध्ये, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; सणासुदीच्या काळात जीएसटी कपातीमुळे विक्रीत मोठी वाढ झाली असून, दररोज सरासरी २०० नवीन वाहने (कार आणि दुचाकी) रस्त्यावर येत आहेत. तीस वर्षांपूर्वी एखाद्या गावात एकमेव चारचाकी, बोटावर मोजण्याइतक्याच दुचाकी दिसायच्या. काही वर्षांपूर्वी दुचाकीसाठी नंबर लावावा लागत होता. त्याची डिलिव्हरी तीन महिन्यांनंतर ग्राहकांना मिळत होती.
आता घरातील प्रत्येक सदस्यांकडे दुचाकी, सरासरी प्रत्येक घरात चारचाकी आहे. काहींकडे पेट्रोलसह ईलेक्ट्रिक बाइकही आहे. केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि त्यासाठी अनेक बँका, फायनान्सचे कर्ज ग्राहकांना सहजासहजी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
ईलेक्ट्रिक वाहने वाढली
सन २०२५ मध्ये ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या ११ हजार १७ इतकी झाली आहे. त्यात ई-दुचाकी १० हजार ४४५, तीनचाकी २८, कारची संख्या ५४४ इतकी आहे.
गेल्या पाच वर्षांतील वाहनांच्या नोंदणीची आकडेवारी
- २०२१- ४३२८२२०२२- ५०३९५
- २०२३- १०४२५८
- २०२४- ६३६७६
- २०२५- ७०८०१
वाहने का वाढली
जीएसटी कपात : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या. ज्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली.
सणासुदीची मागणी : दसरा आणि दिवाळीच्या काळात वाहन विक्रीने मागील सर्व विक्रम मोडले, विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी वाढली.
कर्जाची सुलभता : वाहन खरेदीसाठी कर्ज मिळणे सोपे झाल्याने, अनेक कुटुंबांनी नवीन वाहने घेतली, ज्यामुळे वर्षागणिक ७ हजारांवर वाहनांची भर पडत आहे.
२०२५ मधील प्रमुख वाहन नोंदणी
- दुचाकी - ४३ हजार २७६
- मोटार कार - ११०९७
- ऑटो रिक्षा - ६१४
- ट्रक - ४७०
- डिलिव्हरी व्हॅन - १६२८
- ट्रॅक्टर्स - ३३८
- ट्रेलर - ३३८
गेल्या वर्षीच्या वाहन नोंदणीच्या तुलनेत २०२५ मध्ये वाहनांच्या नोंदणीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. सुलभ कर्ज, वाढती गरज, आणि जीएसटी कपात ही त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी