Kolhapur: बाळ असेल कमी वजनी, 'सीपीआर' ठरेल संजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:44 IST2025-09-02T18:42:58+5:302025-09-02T18:44:25+5:30
निर्जंतुकीकरणासाठी हायटेक यंत्रणा, तापमानाचेही नियंत्रण

Kolhapur: बाळ असेल कमी वजनी, 'सीपीआर' ठरेल संजीवनी
समीर देशपांडे
कोल्हापूर : कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांसाठी आता ‘सीपीआर’मधील नवजात अर्भक अतिदक्षता विभाग संजीवनी ठरणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हायटेक यंत्रणा उभारण्यात आली असून, बाळाच्या वॉर्मरमधील तपमानही नियंत्रित करण्याची यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
याआधीच्या अतिदक्षता विभागात बाळांच्या उच्छ्वासावाटे किंवा स्पर्शावाटे जंतू पसरण्याची प्रक्रिया सुरूच राहत होती. तीच हवा बंद वाॅर्डमध्ये फिरत राही, परंतु आता ही हवा इमारतीवरील ‘एचयु’ युनिटकडे पाठवली जाणार असून तेथून ती शुद्ध होऊन पुन्हा या वॉर्डमध्ये येईल. वरच्या बाजूला ट्रिपल फिल्टर होऊन ही हवा खाली येणार आहे. या विभागात आता २० ऐवजी २५ वॉमर्र बसवण्यात आले असून, सेफ्टिक कम्पार्टमेंट, हाय डिपेन्डन्सी आणि लो डिपेन्डन्सी अशा तीन प्रकारांत या बाळांची विभागणी करण्यात येणार आहे आणि त्याच्या आरोग्यस्थितीनुसार या बाळांना त्या-त्या ठिकाणी ठेवण्यात येईल.
प्रत्येक वॉर्मरचे तापमान नियंत्रित करणारे उच्च दर्जाचे सेन्सर बसवण्यात आले असून, अनेकदा कमी वजनाची आणि कमी दिवसांची मुले गार पडण्याची शक्यता असते. बाहेरील तापमान आणि बाळांच्या शरीराचे तापमान संतुलित करणारी यंत्रणा या ठिकाणी स्थापित करण्यात आली असून, त्यातील बदल हा अलार्मच्या माध्यमातून तातडीने सांगितला जाणार आहे.
दुर्घटना झालीच तर..
अनेकदा अनेक विद्युत उपकरणे असलेल्या विभागांमध्ये आग लागण्यासारखी दुर्घटना घडू शकते. याचा विचार करून या ठिकाणी दुर्दैवाने असा प्रकार झालाच, तर हा सर्व धूर किंवा आग बाळापर्यंत न पोहोचता ती शोषून बाहेर काढण्याचीही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांसाठी आता सीपीआरमध्ये उत्तम अशी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. अगदी पुण्या, मुंबईसारखी ही यंत्रणा येथे उभारण्यात आली आहे. नवजात बालकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे. याच विभागाचे लोकार्पण रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. - डॉ. संगीता कुंभोजकर, बालरोगतज्ज्ञ