Kolhapur-Local Body Election: हातकणंगलेत बहुरंगी लढती; महायुती दुभंगली तर आघाडीत बिघाडी झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:33 IST2025-11-22T16:33:13+5:302025-11-22T16:33:29+5:30
नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ७८ उमेदवार रिंगणात

Kolhapur-Local Body Election: हातकणंगलेत बहुरंगी लढती; महायुती दुभंगली तर आघाडीत बिघाडी झाली
हातकणंगले : येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदासाठीही बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. महायुती दुभंगली तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष स्वबळ अजमावत आहेत. खुले नगराध्यक्षपद असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ आणि नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी एकूण १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना आणि अजित पवार गट अशी पंचरंगी लढत होणार आहे. गेल्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि नगरसेवक पदासाठी ७३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला. अनेक प्रभागांमध्ये माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यात आली. साम, दाम, दंड या सर्व प्रकारांचा वापर झाला तरीही बहुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजू जयसिंगराव इंगवले, शिंदेसेनेकडून अजितसिंह रामगोंडा पाटील, काँग्रेस व शरद पवार गटाकडून दीपक दगडू वाडकर, उद्धवसेनेकडून अभिषेक प्रसाद पाटील, तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दीपक वसंतराव कुन्नूरे हे पाच पक्षांचे आणि दोन अपक्ष उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी पाच राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.