कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:37 PM2023-08-12T18:37:59+5:302023-08-12T18:38:19+5:30

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभ

The Kolhapur-Vaibhavwadi railway line will be speeded up, 3411 crore proposed railway line | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला गती मिळणार असून तीन हजार ४११ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची पीएम गतिशक्तीअंतर्गत शिफारस राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत गुरुवारी करण्यात आली. पीएम गतिशक्ती अंतर्गत हा मार्ग होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा हा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाची शिफारस केली. पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यात दळणवळणाची अधिक सुलभ वाहतूक होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला २०१६ मध्ये मंजुरी दिली होती.

मात्र, त्यानंतर दोनवेळा सर्व्हे होऊनही हा मार्ग रुळावर आला नाही. गत महिन्यात कोकण रेल्वेच्या गोव्यात झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या मार्गाबाबत चर्चा होऊन मध्ये व कोकण रेल्वेची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर हा मार्ग पूर्णत्वाकडे नेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला फायदा होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचण्यास तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ होईल. परिणामी, कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभ

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर कोकणातील खनिजांची व फळांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चात होणार आहे. तर कोकणातील विविध उत्पादनांची वाहतूक पश्चिम महाराष्ट्रात करणे सोयीस्कर ठरणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांसोबतच या दोन्ही भागांमधील विविध उत्पादनांची वाहतूक कमी खर्चात व सुरक्षित होईल. पश्चिम महाराष्ट्रातील साखर व इतर घटक जयगड बंदरावर नेण्यासाठी व कोकणातील फळे, खनिजे पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी हा रेल्वेमार्ग उपयुक्त ठरेल.  - डॉ. रामदास भिसे, वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे पुणे विभाग

Web Title: The Kolhapur-Vaibhavwadi railway line will be speeded up, 3411 crore proposed railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.