Chirag Paswan Net Worth: २ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:46 PM2024-06-10T13:46:27+5:302024-06-10T13:55:26+5:30

Chirag Paswan Net Worth: लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांना मोदी ३.० मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पाहूया किती आहे त्यांची संपत्ती.

Chirag Paswan Net Worth: लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांना मोदी ३.० मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे आणि इतकंच नाही तर त्यांच्या पक्षानं पाच जागा लढवल्या आणि पाचही जिंकल्या. आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आलं आहे. संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती कोट्यवधींमध्ये असल्याचं जाहीर केलंय.

MyNeta.info वर असलेल्या निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बॉलिवूडमध्ये अभिनयातून कारकीर्द सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री बनलेले चिराग पासवान यांच्याकडे २.६८ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. इतकंच नाही तर त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. त्यांच्यावर दायित्व शून्य आहे.

याशिवाय त्यांच्याकडे ४२ हजार रुपयांची रोकड आहे, तर बँकेत सुमारे ७७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बिहारची हाजीपूर ही त्यांच्या वडिलांची परंपरागत जागा आहे, जिथून दिवंगत रामविलास पासवान ९ वेळा खासदार झाले. आता त्यांचे चिरंजीव चिराग पासवान वडिलांच्या जागेवरून विजय मिळवून मंत्री झाले आहेत.

चित्रपटांमध्ये अभिनयाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेल्या चिराग पासवान यांनी २०१४ मध्ये जमुई बिहारमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर यावेळी त्यांनी पारंपरिक मतदारसंघ हाजीपूरमधून विजय मिळवला.

मालमत्तेचा अधिक विचार केल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणतीही विमा पॉलिसी नाही किंवा त्यांनी एनएसएस, पोस्टल सेव्हिंगमध्ये गुंतवणूक केलेली नाही. कारबद्दल बोलायचं झालं तर एक फॉर्च्युनर कार (सुमारे ३० लाख रुपये) आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची जिप्सी त्याच्या नावावर आहे. याशिवाय त्यांच्याकडे १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.

चिराग पासवान यांनीही शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सहा कंपन्यांमध्ये सुमारे ३५ लाख ९१ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये संकटमोचन मर्चंट प्रायव्हेट, अॅक्वाविन ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, स्ट्राँगपिलर प्रायव्हेट लिमिटेड, डिव्हाइन डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रप्पम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सीएसपी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या टर्ममध्ये स्थान मिळवलेल्या चिराग पासवान यांच्या नावावर शेतजमीन नाही. याशिवाय चिराग पासवान यांच्याकडे कोणतीही व्यावसायिक इमारत नाही. मात्र, पाटण्यातील श्रीकृष्णापुरी येथे त्यांच्या नावावर एक आलिशान घर नोंदणीकृत असून, त्याची किंमत १ कोटी २ लाख रुपये आहे.