Kolhapur: मांडरे, चिमगाव विषबाधेचे गूढ उलगडणार; फॉरेन्सिकची तपासणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:54 IST2025-01-03T12:54:13+5:302025-01-03T12:54:36+5:30
कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) आणि चिमगाव (ता. कागल) येथे झालेल्या विषबाधेची फॉरेन्सिक विभागाने तपासणी पूर्ण केली. याचा अहवाल ...

Kolhapur: मांडरे, चिमगाव विषबाधेचे गूढ उलगडणार; फॉरेन्सिकची तपासणी पूर्ण
कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) आणि चिमगाव (ता. कागल) येथे झालेल्या विषबाधेची फॉरेन्सिक विभागाने तपासणी पूर्ण केली. याचा अहवाल दोन दिवसांत करवीर पोलिसांना पाठवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही घटनांचे गूढ उलगडेल. मृतांच्या पोटातील विषाचा प्रकार स्पष्ट होणार असल्याने पुढील तपासाला गती येणार आहे.
मांडरे येथे मुंगूस चावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. चिमगाव येथे दोन चिमुकल्यांना विषबाधेने आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमधील पाच जणांचा मृत्यू नेमका कशाने झाला? त्यांच्या जेवणात कोणी बाहेरून विष कालवले की दोषयुक्त अन्नपदार्थांमुळे विषबाधा झाली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली.
फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी मांडरे आणि चिमगाव येथील दोन्ही घरातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी केली. तसेच मृतांच्या पोटातील अन्नपदार्थांचे काही अंशदेखील त्यांनी तपसाले आहेत. यातून विषबाधेचा प्रकार स्पष्ट होणार आहे. रासायनिक विषाचे अंश आढळल्यास विषप्रयोगावर शिक्कामोर्तब होईल. तसे असल्यास पोलिसांना विषप्रयोग करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा लागणार आहे. अहवालातून काय स्पष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मांडरे आणि चिमगाव येथील दोन्ही घटनांमधील जप्त खाद्य पदार्थांची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली. तांत्रिक विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला आहे. दोन दिवसांत अहवाल करवीर पोलिसांकडे पाठवला जाईल. -अश्विन गेडाम, अधीक्षक, फॉरेन्सिक लॅब
विषबाधेचा अहवाल येताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून पुढील तपास केला जाईल. दोन-तीन दिवसांत सर्व बाबी स्पष्ट होतील. -किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर