इचलकरंजीतील जखमी न्यायाधीशांचा मृत्यू, दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत झाले होते गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:22 IST2023-04-07T16:21:50+5:302023-04-07T16:22:32+5:30
अपघाती निधनामुळे हळहळ

इचलकरंजीतील जखमी न्यायाधीशांचा मृत्यू, दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत झाले होते गंभीर जखमी
अतुल आंबी
इचलकरंजी : मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत यड्राव (ता.शिरोळ) जवळ जखमी झालेले अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. त्यावेळेपासून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज, शुक्रवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
यड्राव (ता.शिरोळ) येथील पार्वती विद्यामंदिरजवळ न्यायाधीश आंबटकर राहत होते. २१ मार्चला नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून ते शतपावली करण्यासाठी यड्राव-जांभळी मार्गावर फिरत होते. त्यावेळी अनिल रामचंद्र जाधव (रा.जांभळी) या मोटारसायकल (एमएच ०९ डीडी ९६४५) स्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले.
उपस्थित नागरिकांनी त्यांना इचलकरंजीतील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ कोल्हापुरातील रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.