'बेल्जी' श्वानाने लावला पहिला वन गुन्ह्याचा छडा, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीच्या श्वानासोबत डॉग ट्रेनर सारिका जाधव यांची कामगिरी
By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2025 12:53 IST2025-12-03T12:53:17+5:302025-12-03T12:53:46+5:30
लष्करी शिस्तीचे खडतर प्रशिक्षण घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुजू झालेल्या वनरक्षक सारिका जाधव या राज्यातील पहिल्या डॉग ट्रेनर

'बेल्जी' श्वानाने लावला पहिला वन गुन्ह्याचा छडा, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीच्या श्वानासोबत डॉग ट्रेनर सारिका जाधव यांची कामगिरी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : लष्करी शिस्तीचे खडतर प्रशिक्षण घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुजू झालेल्या वनरक्षक सारिका जाधव या राज्यातील पहिल्या डॉग ट्रेनर आहेत. ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान घेऊन व्याघ्र प्रकल्पात रुजू होताच मोराच्या शिकारीचा पहिल्याच वन गुन्ह्याचा छडा या श्वानाच्या मदतीने त्यांनी लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
डब्लूडब्लूएफच्या ट्रॅफिक इंडियामार्फत इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाकडून हरियाणातील पंचकुला येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी २८ आठवड्यांचा स्निफर डाॅग प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता. या शिबिरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वनरक्षक सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. या शिबिरामध्ये अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र या आठ राज्यांमधील वन कर्मचारी दाखल झाले होते.
‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे १४ श्वानदेखील उपलब्ध करून दिले होते. या शिबिराला सह्याद्री व्याघ्र राखीवमधून फिरत्या पथकाच्या वनरक्षक सारिका जाधव यांना मुख्य ‘डॉग हँडलर’ आणि पाटणचे वनरक्षक अनिल कुंभार यांना सहायक ‘डॉग हँडलर’ म्हणून पाठवले होते. प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या श्वान प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत आठ राज्यांमधून सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
'बेल्जी'चे वैशिष्ट्य
सारिका यांच्यासोबत वन विभागाच्या सेवेत रुजू झालेल्या 'बेल्जी' नावाचे श्वान चपळ आणि वास घेण्यात पटाईत आहे. २६ नोव्हेंबरला तिला एक वर्ष पूर्ण झाले. ही वाइल्ड लाइफ ट्रेंड श्वान वजनाने २६ ते २७ किलोची आहे. तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे तिने १५ डिसेंबरला उंडाळे येथील मोराच्या शिकारीचा छडा अवघ्या २० मिनिटांत लावला.
ट्रॅकिंग, सर्चिंग, अवैध वस्तू, शिकारी शोधणे या कामांसाठी ही स्निफर डाॅग बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनीती दाखवते. वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी यासारखे बेकायदेशीर गुन्हे शोधून गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात तिची मदत होणार आहे.
ट्रॅफिक इंडिया ही वन्यजीव तस्करीवर देखरेख करणारी आघाडीची अशासकीय संस्था आहे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले हे पथक ड्रग्ज, स्फोटके आणि वन्यजीव प्रतिबंधित वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तू शोधण्यात आणि अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहीम अशा कामांत महत्त्वाचे ठरणार आहे. - तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक/संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प