Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:17 IST2025-12-19T13:16:37+5:302025-12-19T13:17:23+5:30
स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू केली

Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. आता राष्ट्रवादीचा विषय उरला आहे. त्याबाबत कोल्हापूर येथे झालेल्या मुश्रीफ-आवाडे बैठकीत अंतिम तोडगा निघाला नाही. त्यामुळे शक्य तिथे महायुती आणि अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू केली. बुधवारी (दि.१७) आमदार राहुल आवाडे व शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची चर्चा झाली. त्यामध्ये १५-१० जागांपर्यंत चर्चा झाली. त्यातील ५ जागांची तफावत आहे. त्याबाबत गुरूवारी आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर व शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची चर्चा झाली. त्यामध्ये तफावत असलेल्या जागांमध्ये तडजोडीअंती अंतिम निर्णय निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे जुळाल्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुरुवातीलाच ९ जागांवर उमेदवार जाहीर केले तसेच तडजोडीच्या स्थानिक बैठकीत आणखीन जागांची मागणी करण्यात आली. त्यामुळे पहिली फेरी निष्फळ ठरली. त्यानंतर गुरुवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आमदार आवाडे यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यावर बैठक झाली. त्यामध्ये मुश्रीफ यांनी २२ जागांची मागणी केली. त्यामुळे तडजोडीच्या चर्चेचा फज्जा उडाला.
अखेर शक्य तेवढ्या जागांवर युती करू आणि उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल, असा प्राथमिक तोडगा काढण्यात आला. याबाबत वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि उमेदवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय होईल, असे ठरविण्यात आले. या बैठकीस मुश्रीफ आणि आमदार आवाडे यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते.