Kolhapur News: जोतिबा ते कुशिरे न थांबता धावणाऱ्या संतोषला काळाची धाव कळलीच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:43 IST2026-03-25T13:41:08+5:302026-03-25T13:43:14+5:30
दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूने कसबा बावडा हळहळला

Kolhapur News: जोतिबा ते कुशिरे न थांबता धावणाऱ्या संतोषला काळाची धाव कळलीच नाही!
रमेश पाटील
कसबा बावडा : प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत जिद्दीने यश मिळविणारा, पट्टीचा पोहणारा, धावणारा सामाजिक कार्यकर्ता संतोष गायकवाड मंगळवारी काळाच्या गतीपुढे मात्र हरला. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोणजवळ झालेल्या अपघातात पत्नीसह त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच सारा बावडा हळहळला.
संतोष धोंडिराम गायकवाड (वय ४९) व त्यांची पत्नी ॲड. वंदना गायकवाड (४७, रा. बिबट्या बोळ, कसबा बावडा), या दाम्पत्याचा मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कारने ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दहावीची परीक्षा दिलेला मुलगा व इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी, आई बहीण व भाऊ असा परिवार आहे.
संतोष गायकवाड यांनी सुरुवातीच्या काळात पेप्सी विकून आपल्या कुटुंबाचा जम बसवला. लहान-मोठे व्यवसाय केले. एलआयसी एजंट म्हणून त्यांनी काम केले. सध्या ते सोलार पॅनल बसवण्याचे काम करत होते. लग्नानंतर त्यांनी पत्नीला वकील केले. मंगळवारी ते पत्नीसह आपल्या गाडीतून पंढरपूरकडे चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला.
संतोष गायकवाड येथील राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य आहेत. दररोज न चुकता ते बंधाऱ्यावर पोहायला जात. त्यानंतर शक्य होईल तेवढी बंधारा परिसराची स्वच्छता करणे हे त्यांचे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचे ठरलेलं काम असे. दर रविवारी न चुकता जोतिबाला कुशिरे गावातून पळत जायचे आणि परत पळत यायचे हा त्यांचा छंद होता. योगासन, नेहमी व्यायाम करणारे, समाजकार्यात हिरीरीने भाग घेणारा असा जिवलग मित्र गेल्याने नातेवाईकांसह त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला.
दर रविवारी जोतिबा दर्शन
जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिरे गावातून ‘ते’ दर रविवारी न थांबता पळत सुटायचे आणि जोतिबावर पोहोचल्यावरच थांबायचे. जोतिबाचे दर्शन घेऊन एक मंदिराभोवती फेरी मारून परत पळत सुटायचे तो कुशिरे गावात येऊन थांबायचे.
पुरात मुख्य धारेवर घ्यायचे उडी
पंचगंगेला जेव्हा पूर येतो तेव्हा त्या पुरात मुख्य धारेवर उडी मारायची आणि अवघ्या वीस मिनिटांत राजाराम बंधारा घाटावर पोहोचायचे. राजाराम बंधाऱ्यावरून नदीत उडी घेतली की, नदीपात्रातील महादेवाच्या मंदिराला टच करून न दमता ते परत यायचे. असा त्यांचा दिनक्रम; परंतु त्यांचा हा दिनक्रम आता कायमचा बंद झाला आहे.