क्रीडानगरीत पैशाचा खेळ: कोल्हापुरात जलतरण तलावात, कोट्यवधी पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:49 PM2024-05-14T13:49:41+5:302024-05-14T13:51:22+5:30

अनेकांच्या खिशात मुरले पाणी, सात वर्षे गळती आणि दुरस्तीचे काम

The cost of crores for the work of the swimming pool in the Kolhapur Divisional Sports Complex | क्रीडानगरीत पैशाचा खेळ: कोल्हापुरात जलतरण तलावात, कोट्यवधी पाण्यात

छाया : आदित्य वेल्हाळ

सचिन यादव

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंना प्रतीक्षा होती; मात्र अनेक बैठक, चर्चा, आढावा बैठका, जनआंदोलने, तज्ज्ञांचा सल्ला, कोट्यवधींचा निधी आणि निवडलेली जागा चुकीचा असलेला निष्कर्षही काढण्यात आला; मात्र आजअखेर जलतरण तलावाच्या कामासाठी ३ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. कोट्यवधींचा खर्च करूनही संकुलातील दोन तलाव सध्या ओस पडले आहेत. त्यांचा हिशेब आणि अपूर्ण कामासाठी संबंधित असलेले अधिकारी, स्थापन केलेल्या समितीवर कारवाईची मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे. जलतरण तलावावर केलेल्या खर्चाचे पाणी तर अनेकांच्या खिशात मुरले आहे.

जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा होता. त्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून त्याचा आराखडा केला. त्यात त्रुटी राहिल्याने त्या जलतरण तलावामध्ये संकुलाच्या संरक्षक भिंतींमागून जाणाऱ्या छोट्या ओढ्याचे पाणी मुरू लागले. ही बाब संपूर्ण तलाव बांधून झाल्यानंतर लक्षात आली. त्यावर उपाययोजना करण्यात तीन वर्षे घालविली. २५ बाय ५० मीटरच्या या तलावासाठी पुन्हा आराखडा समितीची स्थापना केली. त्या समितीने पुन्हा अहवाल दिले. ५० हून अधिक बैठका विभागीय उपसंचालक, विभागीय आयुक्त स्तरावर झाल्या; मात्र जलतरण तलावाचा प्रश्न काही सुटला नाही. तलावासाठी निवडलेली जागा योग्य नाही, हे लाखो रुपये मानधन दिलेल्या तज्ज्ञांना का समजले नाही, असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करीत आहेत. विभागीय क्रीडा संचालकांच्या स्तरावरून याप्रकरणी अद्याप काही हालचाली झालेल्या नाहीत.

सात वर्षे गळती आणि दुरस्तीचे काम

जलतरण तलावाचे संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर जमिनीतून उमाळे आणि अशुद्ध पाणी मिसळू लागले. ती लागलेली गळती काढण्याचा गेली सात वर्षांत अनेकवेळा प्रयत्न झाला; मात्र तो यशस्वी झालेला नाही. आयआयटीच्या तज्ज्ञांनीही या प्रश्नावर हात टेकले.

जलतरणाच्या नावांवर ३ कोटी ७२ लाखांचा खर्च

  • जलतरण तलाव : ७१ लाख ६९ हजार ५९६
  • डायव्हिंग तलाव : १ कोटी ५ लाख २३ हजार ३१५
  • जलतरण तलावाचा डेक, संरक्षक भिंत : ६३ लाख ३९ हजार १३९
  • जलतरण तलाव प्रेक्षक गॅलरी, फिल्टर रूम : १ कोटी २० लाख ९४ हजार ११४
  • डायव्हिंग प्लॅटफार्म : ११ लाख ४१ हजार १००


खोल्यांची दुरवस्था

जलतरण तलावाजवळील गॅलरीखालील सर्व खोल्यांची दुरवस्था झाली आहे. या खोलीत प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. खोलीत काही ठिकाणी फरशा बसविलेल्या नाहीत. तर काही ठिकाणच्या फरशा उखडल्या आहेत. रिकाम्या खोल्यांत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर जलतरण गॅलरीखाली पाणी साचून राहते. त्यामुळे अनेकदा डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो.

कागदोपत्री पूर्णत्वाची टक्केवारी

  • जलतरण तलाव : ६५ टक्के
  • डायव्हिंग तलाव : ८३ टक्के
  • जलतरण तलावाचा डेक, संरक्षक भिंत : ६३ टक्के
  • जलतरण तलाव प्रेक्षक गॅलरी, फिल्टर रूम : ५० टक्के
  • डायव्हिंग प्लॅटफार्म : ९३ टक्के

Web Title: The cost of crores for the work of the swimming pool in the Kolhapur Divisional Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.