अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:14 IST2025-08-01T13:13:33+5:302025-08-01T13:14:06+5:30
अंत्यसंस्कार केलेली महिला कोण

संग्रहित छाया
जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) : उदगाव (ता. शिरोळ) येथील बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह मिळाला. तिच्यावर अंत्यसंस्कारदेखील झाले. मात्र, रक्षाविसर्जनाच्या दिवशी ती गावाकडे परतल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे पोलिसदेखील अचंबित झाले. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेली ती महिला कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
उदगाव (ता. शिरोळ) येथील संजना महेश ठाणेकर (वय ३७) या १९ जुलैपासून बेपत्ता झाल्याची नोंद २३ जुलैला जयसिंगपूर पोलिसांत झाली होती. मंगळवारी (दि.२९) निलजी बामणी (ता. मिरज जि.सांगली) येथील कृष्णा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती. मिरज पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसात दिली. त्यानंतर महेश ठाणेकर हे खात्री करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात गेले होते.
नदीपात्रात मृतदेह सापडल्यामुळे फुगलेला चेहरा ओळखत नव्हता. त्यामुळे महेश यांनी अंगावरील कपडे, गालावरील तीळ व अन्य खुनांमुळे पत्नीचाच मृतदेह असल्याची खात्री केल्यानंतर तो मृतदेह ठाणेकर यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मंगळवारी रात्री उदगाव वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (दि. ३०) उदगाव वैकुंठधामात रक्षाविसर्जनही करण्यात आले.
तर बुधवारी दुपारी संजना या उदगाव येथे बचतगटातील पैसे भरण्यासाठी आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर त्या लगेचच निघून गेल्या होत्या. ही माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा राबविली. प्रत्यक्षात महिला पोलिसांत हजर झाल्याने उपस्थित सर्वांनी डोक्याला हात लावला. पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता संजना हिने तासगाव व बारामती येथे गेल्याचे सांगितले. तिला पाहून घरच्यांनाही धक्काच बसला. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेली महिला कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसात हजर झालेल्या संजना ठाणेकर यांनी तासगाव व बारामती येथे गेल्याचा जबाब दिला आहे. अंत्यसंस्कार केलेली महिला ही दुसरीच असून याबाबतचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून होणार आहे. - सत्यवान हाके, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर जि.कोल्हापूर