Kolhapur: ‘गोकुळ’ बिनविरोधसाठी विनय कोरे यांना संचालकांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:13 IST2026-03-26T12:10:04+5:302026-03-26T12:13:15+5:30
सकारात्मक चर्चेची ग्वाही : लवकरच इतर नेत्यांचीही संचालक भेट घेणार

Kolhapur: ‘गोकुळ’ बिनविरोधसाठी विनय कोरे यांना संचालकांचे साकडे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने बुधवारी ‘जनसुराज्य’ पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे केली. संघाचे हित पाहता, बिनविरोधसाठी आपण सगळ्यांशी सकारात्मक चर्चा करु, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे समजते.
‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत ४ मे २०२६ रोजी संपत आहे. सध्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. महायुती म्हणून निवडणूकीला सामोरे जाण्याची घोषणा नेत्यांनी केली आहे. पण, निवडणूकीतील स्पर्धा पाहता आणि त्यातून होणारा खर्च टाळण्यासाठी बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेत, अशी चर्चा ‘गोकुळ’च्या वर्तूळात सुरु आहे. बुधवारी संघाच्या संचालक मंडळाची बैठक होती. त्यानंतर अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने वारणानगर (ता. पन्हाळा) येथे जाऊन आमदार कोरे यांची भेट घेतली.
यामध्ये, संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने संभाव्य प्रशासक नियुक्त्याच्या चर्चा, अवसायक नेमणूक बाबत ११०८ दूध संस्थांना अंतरिम काढलेला आदेश यासह विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी, ‘गोकुळ’च्या निवडणूकीतील इर्षा पाहता ही निवडणूक नेत्यांसह संचालकांना परवडणारी नसल्याचे सांगत बिनविरोधसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कोरे यांनी सांगितल्याचे समजते. दरम्यान, याबाबत आमदार सतेज पाटील यांची संचालक मंडळ लवकरच भेट घेणार आहे.
करवीर, राधानगरीच्या संचालकांचे कान टोचले!
संघाच्या मागील निवडणूकीत ‘करवीर’, ‘राधानगरी’ तालुक्यातील संचालकांनी गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील उमेदवारांना मतदान केले नसल्याचा मुद्दा आमदार कोरे यांनी उपस्थित केला. तुम्ही तसे करणार असाल तर यावेळी तेही तसेच करतील, असा सूचक इशारा देत कान टोचले.