Kolhapur: सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात पाणीच पाणी, रुग्णांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:36 IST2025-05-21T16:35:27+5:302025-05-21T16:36:05+5:30
कोल्हापूर : जिल्ह्याचा थोरला शासकीय दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इमारतींची दयनीय अवस्था मंगळवारी कोसळलेल्या पावसाने ...

Kolhapur: सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात पाणीच पाणी, रुग्णांचे हाल
कोल्हापूर : जिल्ह्याचा थोरला शासकीय दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इमारतींची दयनीय अवस्था मंगळवारी कोसळलेल्या पावसाने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पावसामुळे येथील गोदावरी इमारतीमधील अपघात विभागात पाणीचपाणी झाल्याने रुग्णांना अक्षरश: पाण्यात उभे राहून उपचार घेण्याची वेळ आली. येथील बेडवर पाणी साचल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही पाण्यात उभे राहूनच काम करावे लागले.
सध्या सीपीआरच्या नूतनीकरणाचे काम सुुरू असल्याने अपघात विभागास येथील पोलिस चौकी गोदावरी इमारतीत स्थलांतरित केली आहे. मंगळवारी रात्री पाऊस पडल्याने इमारतीला गळती लागून अपघात विभागात पाणीच पाणी झाले. रुग्णांना दुसरीकडे तत्काळ हलवणे शक्य नसल्याने पाण्यात उभे राहूनच त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. विशेष म्हणजे, या इमारतीमधील स्लॅब गळत असल्याने रुग्णांच्या बेडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही रुग्णांना रक्तस्राव झाल्याने तो थांबवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात असताना गळतीमुळे त्यात वारंवार अडथळे आले.
पोलिस चौकीचे बनले तळे
सीपीआरमधील पोलिस चौकीही गोदावरी इमारतीत आहे. पावसाच्या पाण्याने या चौकीचे तळे बनले होते. त्यामुळे नोंदी घेतानाही संबंधित पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. रजिस्टर पाण्यात भिजत असल्याने नोंदी घेणेही अवघड झाले होते.