अनिल बिरंजे -पट्टणकोडोली : येथे शिवाजी चौकात कोणतीही परवानगी न घेता शनिवारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा काढणारच अशी प्रशासनाची भूमिका आहे,तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे यासाठी जीव गेला तर बेहत्तर पण पुतळा आता हलवू देणार नाही असा शिवभक्तांनी पवित्रा घेतला आहे .यामुळे गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
गावात सन १९८७,१९९७,२०१० दरम्यान मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्याने पट्टणकोडोली(ता.हातकणंगले) हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावात कोणताच पुतळा बसविण्यासाठी परवानगी नाही,तरी ही शिवभक्तांनी गुढीपाडवा मुहूर्त साधून जूना एसटी स्टँड येथे सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारला आहे. ग्रामपंचायतने या पुतळ्यासाठी योग्य ती परवानगी घेऊ अशी भूमिका घेतली आहे.आता हा पुतळा हलवू देणार नाही म्हणत शिंदेसेनेचे नेते मुरलीधर जाधव, सरपंच अमोल बाणदार, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव जाधव, प्रकाश जाधव,गुंडूराव मोरे , विठ्ठल रामाण्णा व कार्यकर्ते पहाटे चार वाजले पासून येथे तळ ठोकून आहेत. हुपरी पोलीस स्टेशनसह कोल्हापूर जिल्हा राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.