जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:08 IST2025-08-11T15:08:24+5:302025-08-11T15:08:55+5:30

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे मंडळांना आवाहन

Taking subscription by force is a crime of extortion Kolhapur Superintendent of Police warns | जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांचा इशारा 

संग्रहित छाया

कोल्हापूर : नागरिक आणि व्यावसायिकांनी इच्छेने दिलेली वर्गणी मंडळांनी स्वीकारावी. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास संबंधित मंडळांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला. तसेच सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. यातील किमान एक कॅमेरा आपल्या परिसरात कायमस्वरूपी ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यावर किमान साडेआठ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील.

जिल्ह्यात साडेआठ हजार गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांना स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदणी करणे आणि विविध प्रकारच्या परवानग्या घेणे बंधनकारक केले आहे. वर्गणी गोळा करायची असल्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागले. काही मंडळांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते. याचा त्रास नागरिक आणि व्यावसायिकांना सहन करावा लागतो.

यातून काही वादाचेही प्रसंग उद्भवतात. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळांनी वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, असे आवाहन केले आहे. याबाबत तक्रारी आल्यास संबंधित मंडळांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे.

जिल्ह्यावर साडेआठ हजार कॅमेऱ्यांची नजर

विधायक आणि समाजोपयोगी उत्सव साजरा होण्यासाठी अधीक्षकांनी सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. यातील किमान एक कॅमेरा मंडळांनी पुढे वर्षभर आपल्या परिसरात लावावा. त्याची देखभाल दुरुस्ती करावी. किमान एक महिन्याचे फुटेज सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे सुरक्षा आणि गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तक्रारी करण्याचे आवाहन

मंडळांकडून जबरदस्तीने वर्गणी घेतली जात असल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. संबंधित मंडळांवर तातडीने कारवाई करून त्यांना अद्दल घडवली जाईल, अशी माहिती अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

बैठकांचे आयोजन

पोलिस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीतील मंडळांसाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांची बैठक झाली आहे. करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांची बैठक पुईखडी येथील एका मंगल कार्यालयात लवकरच होणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

Web Title: Taking subscription by force is a crime of extortion Kolhapur Superintendent of Police warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.