महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १८ नद्यांचे सर्वेक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:25 IST2025-02-28T19:24:46+5:302025-02-28T19:25:22+5:30

जूनपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार : उपाययोजनांचा आराखडा जुलैनंतर

Survey of 18 rivers in Kolhapur, Sangli and Satara districts under flood control program started | महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १८ नद्यांचे सर्वेक्षण सुरू

महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १८ नद्यांचे सर्वेक्षण सुरू

कोल्हापूर : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १० नद्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १८ नद्यांचे सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता (उत्तर) स्मिता माने यांनी दिली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत यावर उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

कोल्हापूर आणि सांगलीला येणारा महापूर कसा नियंंत्रित करता येईल, यासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी राजापूरपासून कृष्णेपर्यंतच्या सर्व नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण व मॉडेलिंग केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रतिसाद विकास कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी दिल्ली येथील खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीने १५ दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील नदीपात्रांचे सर्वेक्षण सुरू केले असून, बेंचमार्क सुरू आहे. तिन्ही जिल्ह्यांतील १८ नद्यांच्या १ हजार ४५५ किलोमीटर अंतरातील नदीपात्रांचे तसेच १७ मोठ्या नाल्यांचेही सर्वेक्षण होणार आहे. यासाठी १० जणांचे पथक कार्यरत आहे.

  • पाटबंधारे विभागाकडून ३२०० कोटींचा आराखडा
  • १६८० कोटींची कामे सुरू
  • कोल्हापूरसाठी - ८०० कोटी
  • सांगलीसाठी - ८८० कोटी
  • सर्वेक्षणासाठी - ८ कोटींची निविदा मंजूर
  • सर्वेक्षणाचा पहिला टप्पा : पंचगंगा नदीसह भोगावती, कुंभी, कासारी, वारणा, तुळशी, कडवी, धामणी, दूधगंगा, वेदगंगा.
  • दुसरा टप्पा : सांगली जिल्ह्यातील १ नदी, सातारा जिल्ह्यातील ७ नद्या (६९८ किलोमीटर अंतरातील नदीपात्र)
  • कृष्णा नदीचा ३९८ किलोमीटर पात्रातील कऱ्हाड ते हिप्परगी बॅरेज या अंतरातील सर्वेक्षण
  • आराखडा बनविण्यासाठी १ वर्षाची मुदत


आराखडा जून, जुलैनंतरच शक्य

कोल्हापुरातील नद्यांच्या सर्वेक्षणाला १५ दिवसांपूर्वीच प्रारंभ झाला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नद्यांचे सर्वेक्षण मे महिन्यात सुरू होणार आहे. सर्वेक्षणाचे हे काम जूनपर्यंत पूर्ण झाल्यानंतर त्यातील निष्कर्षाचा अभ्यास करून उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे महापूर नियंत्रणाबाबत खऱ्या अर्थाने जून किंवा जुलै महिन्यानंतरच उपाययोजनांचा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे.

क्रॉस सेक्शनचा अभ्यास

अक्षांश-रेखांशासह पातळी मिळण्यासाठी ‘डीजीपीएस’ उपकरणाद्वारे नदीचे क्रॉस सेक्शन (आडवे छेद) अभ्यासण्यात येणार आहेत. यासाठी इको-साऊंडर, पाण्यातील पातळीसाठी स्वयंचलित बोट तसेच ड्रोनचा वापर करुन महापुराची तीव्रता, व्याप्ती यांचेही मूल्यमापन होणार आहे. याशिवाय पाऊस किती पडला, पाण्याचा विसर्ग किती आणि महापुराचा अंदाज याचा अभ्यास करून उपाययोजनांचा आराखडा सादर केला जाणार आहे.

Web Title: Survey of 18 rivers in Kolhapur, Sangli and Satara districts under flood control program started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.