सुरतचा अभियंता करणार कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत, शिंगणापूर योजनेतून पाणी देण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:27 IST2025-08-30T18:26:43+5:302025-08-30T18:27:04+5:30
सॉफ्टवेअरची आज दुरुस्ती

सुरतचा अभियंता करणार कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत, शिंगणापूर योजनेतून पाणी देण्याचे नियोजन
कोल्हापूर : काळम्मावाडीच्या थेट पाइपलाइन योजनेमधील एका पंपात बिघाड झाल्याने कोल्हापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एका पंपाचे व्हीडीएफ कार्ड बदलूनही सॉफ्टवेअरमध्ये एरर दाखवत असल्याने आता याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीच्या अभियंत्याला सुरतहून पाचारण केले आहे.
हा अभियंता आज, शनिवारी दुपारी कोल्हापुरात पोहोचणार असून त्यानंतर सॉफ्टवेअरच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली. हे काम दोन दिवसांत पूर्ण झाले तर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घाटगे म्हणाले, काळम्मावाडीतील चार पंपांपैकी तीन पंप सुरू होते. एक पंप अतिरिक्त होता. यांतील दोन पंपांमध्ये बिघाड झाला आहे. यासाठी दोन वेळा व्हीडीएफ कार्ड बदलले, परंतु यश आले नाही. त्यामुळे संबंधित सॉफ्टवेअरच्या एबीपी कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या अभियंत्यांना कोल्हापुरात बोलावले आहे. हा अभियंता आज शनिवारी दुपारपर्यंत काळम्मावाडीत पोहचेल. त्यानंतर याची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
शिंगणापूरही आज सुरू होणार
शिंगणापूर पंपिग स्टेशनच्या ट्रान्स्फॉर्मरचे काम पूर्ण केले आहे. आज, शनिवारी दुपारी ट्रायल घेऊन संध्याकाळपर्यंत शिंगणापूरचा पंपही सुरू करण्यात येईल. काळम्मावाडीतून थेट बावड्याला, शिंगणापूर योजनेतून ई वॉर्ड, राजारामपुरी व बालिंगा पंपामधून सी व डी वॉर्डांना पाणी देण्याचे नियोजन केले असल्याचे घाटगे यांनी सांगितले.